Posts

Showing posts from October, 2026

नातू रिधानला वाढदिवस शुभाशीर्वाद

Image
    🎂❤️ आमचा लाडका नातू रिधान – पाचव्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️🎂 ऑगस्ट २०२५ मधील मलेशियातील एक प्रसंग आजही माझ्या मनात ताजा आहे. मी, माझी पत्नी, सौ. रंजना, मुलगी हर्षदा आणि नातवंडे नित्या व नैतिक असे आम्ही सर्वजण मलेशियाला गेलो होतो. विमानतळावरून माझा मुलगा मिलिंद याच्या राहत्या टॉवरजवळ पोहोचल्यानंतर मी गाडीतून आधी उतरलो, तर मिलिंद गाडी पार्क करण्यासाठी पुढे गेला. तेवढ्यात माझे लक्ष टॉवरमधून बाहेर येणारा माझा नातू रिधान आणि सून रसिका यांच्याकडे गेले. मला पाहताच रिधान धावत सुटला. जसजसा तो जवळ येत होता, तसतसा त्याचा वेग वाढत होता. अखेर माझ्याजवळ येताच त्याने आनंदाने “बाबा!” अशी हाक मारली आणि मला घट्ट मिठी मारली. त्याच्या त्या निरागस धावण्यातून आणि प्रेमळ मिठीतून व्यक्त झालेला आनंद शब्दांत सांगता येणार नाही. नातवाच्या प्रेमाची ती अविस्मरणीय अनुभूती माझ्या हृदयात कायमची कोरली गेली. ❤️ रिधानच्या निरागसतेला समर्पित काही ओळी! ❤️ दोन पिढ्यांमधील अंतर, प्रेमाचा धागा जोडतो, आमच्या सुरकुतलेल्या हातांत, त्याचा इवलासा हात असतो! त्याच्या निरागस हास्यात, आमचं बालपण फुलतं,...

कौतुकाची थाप, प्रेरणेचा ठेवा!

Image
आमच्या एव्हरग्रीन ग्रुपचे ग्रुप लीडर, आदरणीय श्री. घाडगे साहेब दीर्घ कालावधीनंतर अमेरिकेहून मुंबईत परत येत आहेत, ही बातमी ऐकून संपूर्ण ग्रुपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. घाडगे साहेब मुंबईत असले की आमच्या गेट-टुगेदरच्या पार्ट्यांचे प्रमाण वाढलेले असते! त्यांच्या उत्साही सहवासामुळे आमच्या भेटीगाठींना एक वेगळीच मजा आणि आनंद मिळतो. त्यांच्या या स्वगृही पुनरागमनाचे मनःपूर्वक स्वागत! 💐 अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे, प्रत्येक स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व, तेथील वैशिष्ट्ये आणि स्वतः अनुभवलेला आनंद यांचे सुंदर शब्दांत वर्णन करून ते मला वेळोवेळी पाठवत असत. त्यांच्या या अनुभवसंपन्न लेखनातून इतरांनाही अमेरिकेची सफर घडते. त्यांच्या या लेखनाचा उपयोग करून ‘अमेरिकेतील भटकंती’ या विषयावर एक माहितीपूर्ण पुस्तिका तयार करावी आणि अमेरिकेला जाणाऱ्या आपल्या मित्रांना संदर्भासाठी द्यावी, अशी सूचना मी त्यांना केली आहे. त्यांच्या अनुभवांचा हा ठेवा निश्चितच अनेकांसाठी उपयुक्त ठरेल. माझ्या ‘जीवन तरंग’ या वेबसाईटची माहिती मी १५ ऑगस्ट २०२६ रोजी इतर मित्रांप्रमाणेच घाडग...

मार्गदर्शक आणि संस्कार जपणूक

Image
  श्री. अशोक कुंभार – मार्गदर्शन आणि संस्कार जपणूक आरसीएफमधील माझे वरिष्ठ अधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्याशी नाळ जोडलेले, सध्या अल्पकालीन वास्तव्यासाठी अमेरिकेत असलेले श्री. अशोक कुंभार साहेब यांचा आज वाढदिवस! त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! या आनंददायी प्रसंगी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! नुकतेच त्यांनी अमेरिकेत असतानाही माझ्या ‘जीवन तरंग’ या वेबसाईटला भेट देऊन माझ्या लेखनाचे मनापासून कौतुक केले. मी त्यांना माझ्या वेबसाईटची कल्पना सांगितल्यानंतर त्यांनी केवळ उत्सुकतेपोटी त्याची दखल घेतली नाही, तर माझे लेखन आस्थेने वाचून त्यातील बारीकसारीक संदर्भ आणि तपशीलांबाबत मोलाच्या सुधारणा सुचवल्या. त्यांच्या या सूक्ष्म निरीक्षणातून त्यांची अभ्यासू वृत्ती, लेखनाविषयीची अभिरुची आणि दुसऱ्याच्या प्रगतीबद्दलची आत्मीयता प्रकर्षाने जाणवली. अमेरिकेत वास्तव्यास असूनही भारतातील सोयीच्या वेळेनुसार माझ्याशी संपर्क साधणे, माझ्या लेखनात मनापासून रस घेणे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करणे, ही माझ्यासाठी विशेष आनंदाची आणि अभिमानाची ...

शाही विवाहसोहळा आणि आध्यात्मिक यात्रा

Image
  विवाहाचा आनंद, मैत्रीचा सुगंध आणि अध्यात्माचा दिव्य अनुभव! श्री. सुधांशू देबनाथ हे आमच्या आरसीएफ एव्हरग्रीन ग्रुपचे निवृत्त असूनही तरुण, तडफदार आणि मनमिळाऊ सदस्य! सौ. सुरुची त्याची मुलगी आज त्याच्या घरी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने माहेरी येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आज तिच्या स्वागताच्या निमित्ताने तिच्या लग्नाच्या सोहळ्या संबंधीचं माझं मनोगत प्रसारित करत आहे. देबनाथ यांनी मे २०२६ मध्ये आपल्या कन्या सुरुचीच्या विवाहसोहळ्याचे आम्हाला प्रेमपूर्वक निमंत्रण दिले. त्यानुसार श्री. घाडगे साहेब, माने साहेब, दिवेकर साहेब, राजेंद्र जोशी, सुनील कवळे, एन. एम. पाटील, मी आणि माझी पत्नी रंजना लखनऊला रवाना झालो. एका शाही विवाहसोहळ्यात सहभागी होण्याचा योग हा आमच्यासाठी आनंदाचा आणि आयुष्यभर स्मरणात राहील असा अनुभव ठरला. या विवाहाच्या निमित्ताने केवळ मंगलमय सोहळ्याचा आनंदच मिळाला नाही, तर जुन्या मित्रांचा सहवास, नव्या ओळखी, अविस्मरणीय क्षण आणि अयोध्या-काशीच्या आध्यात्मिक यात्रेचे पुण्यही लाभले. खऱ्या अर्थाने हा दुहेरी आनंदाचा ‘ दुग्धशर्करा योग’ होता! या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने लखनऊमधी...

कणखर नेतृत्व , पण मनात माणुसकीचं दातृत्व

  कणखर नेतृत्व , पण मनात माणुसकीचं दातृत्व माणसाच्या आयुष्यात काही व्यक्ती अशा भेटतात, की त्यांच्या सहवासातील आठवणी काळाच्या ओघातही मनात कायम जिवंत राहतात. त्यांनी दिलेली प्रेरणा, कौतुकाची थाप आणि अडचणीच्या प्रसंगी दिलेला आधार आयुष्याला नवी दिशा देतो. आरसीएफ मध्ये असताना मला लाभलेले असेच एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. एस. के. खत्री साहेब! १९८३ मधील एक अविस्मरणीय आठवण! श्री. एस. के. खत्री  यांची बदली आमच्या वित्त विभागात झाल्यावर आमच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण ती भीती कशी गेली हे खालच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. १९८३ साली मी नवी मुंबईत नव्या घरात राहायला आलो होतो. एकदा खत्री साहेब माझ्या घरी आले. त्यावेळी घरात साधी खुर्ची किंवा सोफासुद्धा नव्हता. त्यामुळे त्यांना चटईवर बसवून चहा देण्याची वेळ आली. मनात थोडासा संकोच आणि अवघडलेपणा होता; पण खत्री साहेबांनी माझी परिस्थिती समजून घेतली. निघताना त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, “Don't worry, beta. Everything will happen good in your life. Keep it up!” त्यांचे ते शब्द आजही माझ्या का...

कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघ, मुंबई महानगर

 अनिल पाटील अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ, मुंबई महानगर यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पोस्ट केलेला मेसेज :- नमस्कार दिनांक ११ ऑक्टोंबर २०२६,रविवार घटस्थापना दिवस. कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघ मुंबई महानगर संघटनेच्या वतीने समाजातील अनेक प्रश्नांवर संघटनेची महत्वपूर्ण मीटिंग वाशी सेक्टर 15 वैदिक विश्व येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सदर मीटिंग मध्ये श्री.अनिल शालन मारुती पाटील (कागल) आणि त्यांच्यासह 16 कार्यकारी सदस्य ( नावांचा उल्लेख वगळला आहे)  उपस्थित होते. श्री.बाळासाहेब शिंत्रे साहेब यांचे जाहीर आभार काल , सायंकाळी ५.०० ते ९.०० दरम्यान ही मीटिंग संघटनेचे मार्गदर्शक ,सल्लागार आणि जिल्ह्याला लाभलेले रत्न,आदर्श व्यक्तिमत्व शांत, सयंमी,अभ्यासु,आदर्श असे श्री.बाळासाहेब शिंत्रे साहेब यांनी नियोजन करून दिलेल्या वास्तू मध्ये पार पडले. संघटनेला साहेबांचे नेहमीच पाठबळ असते आणि नेहमीप्रमाणे काल ही त्यांनी सहकार्य केले यासाठी साहेबांचे मनापासून आभार. घटस्थापना सण दिवस साजरा करायचा असतानाही समाजासाठी सहन करून संघटनेला वेळ देणारी टीम संघटना भक्कम व्हावी,समाज संघटीत व्हावा ,ल...

माणूस म्हणून जगायचं कसं?

 नाना पाटेकर यांच्या निधनानंतर व्हाट्सअप च्या माध्यमातून लाभलेला हा एक भावस्पर्शी लेख. नाना गेले… पण ‘माणूस’ म्हणून जगण्याचा एक विचार मागे ठेवून गेले काही माणसं जातात… आणि त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती हरवत नाही, तर समाजातील एक आवाज, एक विचार आणि एक संवेदनशील मन हरवतं. नाना पाटेकर यांचं आज झालेलं निधन ही अशीच एक मनाला चटका लावणारी घटना आहे. नाना पाटेकर हे नाव घेतलं की डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो तो त्यांचा दमदार अभिनय, त्यांचा खणखणीत आवाज, त्यांच्या संवादफेकीतील धार आणि पडद्यावरची विलक्षण उपस्थिती. पण नानांना केवळ अभिनेता म्हणून आठवणं म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याप्ती खूपच कमी करून पाहणं होईल. नाना हा एक संवेदनशील माणूस होता. समाजात घडणाऱ्या गोष्टींकडे केवळ प्रेक्षक म्हणून पाहणं त्यांना मान्य नव्हतं. अन्याय दिसला तर त्यावर बोलायचं, प्रश्न जाणवला तर तो समाजासमोर मांडायचा आणि शक्य असेल तिथे स्वतः काहीतरी करायचं—ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू होती. त्यांच्या स्वभावात एक कणखरपणा होता. ते आपलं मत मांडताना फारसं आडपडदा ठेवत नसत. कुणाला ते मत आवडेल किंवा नाही, याचा ...

मैत्रीचा अतूट बंध

मैत्रीचा अतूट बंध माझ्या आयुष्यात अशी काही व्यक्तिमत्त्वे येऊन गेली की आजही त्यांची आठवण झाली की डोळे पाणावतात. आरसीएफमधील कोळी साहेब, न्यू कृष्णा टॉवरमधील तोमर साहेब, माझी मावशी तानुबाई, माझ्या सासूबाई शांताबाई आणि शिवसेनेतील मनोहर गायखे साहेब या व्यक्तींना मी कधीच विसरू शकत नाही. काही व्यक्तींबाबत तर मला मनापासून असे वाटते की, कदाचित त्यांचे आणि माझे पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असावेत. माझ्या आयुष्याच्या वाटेवर अनेक मित्र भेटले, पण मैत्रीण म्हणून सांगण्यासारखी एकच व्यक्ती ती म्हणजे पन्नास वर्षांपासूनची जिवलग मैत्रीण मीना राव. आज अचानक अमेझॉनचे एक पार्सल घरी आले. ते माझा नातू रिधानच्या नावाने होते. त्याच्या नावाने आलेले ते पहिलेच पार्सल असावं. ते उघडल्यावर त्यामध्ये मीनाने रिधानसाठी एक सुंदर खेळ पाठवला होता. तो खेळ पाहताच रिधान आनंदाने अक्षरशः उड्या मारू लागला. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागस आनंद शब्दांत व्यक्त करणे अशक्य! फक्त मी ते भाव वाचू शकलो. त्या छोट्याशा भेटीने माझे मन पन्नास वर्षे मागे गेले आणि आमच्या मैत्रीचा संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला. सन १९७६ मध्ये मी एक...

हम सात साथ - अनोखं गेट-टुगेदर

 जुलै 2026   'हम सात साथ' – अविस्मरणीय फॅमिली गेट-टुगेदर जवळपास पन्नास वर्षांपूर्वीची आमची ऑफिसमधील सहकारी मीना राव मुंबईत आली आणि तिच्या भेटीच्या निमित्ताने 'हम सात साथ' मित्रपरिवाराचे एक सुंदर फॅमिली गेट-टुगेदर नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन येथे आयोजित करण्यात आले. अनेक वर्षांनंतर सगळे कुटुंबासह एकत्र आल्यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि आपुलकी होती. एकत्र लंचचा आस्वाद घेत घेत १९७७ च्या काळातील ऑफिसमधील आठवणींना उजाळा मिळाला. एक्स्पान्शन अकाउंट सेक्शन मध्ये त्या काळात कोणकोण सहकारी होते, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांपासून ते कार्यालयातील अनेक गमतीदार प्रसंगांपर्यंत सर्व आठवणी पुन्हा एकदा जिवंत झाल्या. जणू काळाचे चाक पन्नास वर्षे मागे फिरले होते. मीना राव आणि आमच्या महिला मंडळाच्या गप्पा तर विशेषच रंगल्या. एकेक आठवण निघत गेली आणि हास्याचे फवारे उडत राहिले. भावे बऱ्याच वर्षापासून सुचवत असलेले फॅमिली गेट-टुगेदर प्रत्यक्षात साकार झाल्यामुळे सौ. भावे यांच्या चेहऱ्यावरही समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. या आनंदी सोहळ्यात मात्र श्री. ढाके यांच्या कुटुंबाची उणीव सर्वांनाच ज...

रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट- महत्त्वाचे टप्पे

Image
1) रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचा नव्याने श्री गणेशा  28 डिसेंबर 2022   सर्व सभासद बधु भगिनींना आणि युवा जनरेशन २ मधील सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏   नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण 8 जानेवारी 2023 रोजी  आपल्या सर्वांचे स्वप्न साकारण्यासाठी एकत्र येत आहोत. आपल्या १६० कुटुंबियांची जिवितहानी टाळण्यासाठी होऊ घातलेल्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये सर्वांनी ठामपणे निर्णय घेऊन आपला हा १७ वर्षे रखडलेला प्रोजेक्ट मार्गी लावू या. त्या दिवशी यशाच्या शिखराची दहीहंडी आपल्याला फोडायची आहे. दहिहंडीचं उदाहरण मी आवर्जून देत आहे, कारण दहीहंडी फोडणारी व्यक्ती ही जरी एकटी असली तरी त्यांच्या यशामध्ये त्याला खालून आधार देणाऱ्या सर्व मंडळींचा आणि आजुबाजूने cheer up करणाऱ्यांचा सुध्दा तितकाच महत्वाचा वाटा असतो, हे विसरून चालणार नाही. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की *जे झालं ते विसरून* आपण सर्वांनी एकमताने प्रोजेक्ट पुढे नेऊया. त्यामध्ये कायद्याचा कीस काढून जर ही आताची संधी दवडली, तर आपल्याला पुन्हा परमेश्वरही माफ करणार ना...

भव्य स्वागत कमान - आमच्या गावची शान.

पेद्रेवाडी उर्फ सुंदरवाडी गावाच्या दक्षिण प्रवेशद्वारावर आज उभी राहिलेली ही भव्य, आकर्षक आणि दिमाखदार स्वागत कमान म्हणजे केवळ एक वास्तू नसून गावाच्या एकोप्याचं, अभिमानाचं आणि सामूहिक श्रमांचं प्रतीक आहे. अनेक वर्षांपासून मनामध्ये जपलेलं एक सुंदर स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झालं आणि त्यामुळे पेद्रेवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या प्रेरणादायी कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आजी-माजी सैनिक व पोलीस संघटना, पेद्रेवाडी यांचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐                   आपण सर्वांनी पोलीस आणि सैनिक क्षेत्राची निवड केली, हे केवळ नोकरी म्हणून नव्हे; तर देशसेवा आणि जनसेवा करण्यासाठी नियतीनेच आपल्या खांद्यावर दिलेली एक पवित्र जबाबदारी होती, असे म्हणावे लागेल. देशाच्या सुरक्षेसाठी आणि समाजाच्या सेवेसाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्यामुळे आपण सर्व खऱ्या अर्थाने सन्मानास पात्र आहात. विशेष म्हणजे, आपण सर्वांनी स्वतःहून देणगी स्वरूपात निधी उभारून कोल्हापूर जिल्ह्यातील एक नंबरची स्वागत ...

गुरुवर्य श्री शशिकांत आण्णा - नव्वदीचा चिरतरुण

Image
 25 मे 2025 श्री. शशिकांत चव्हाण (आण्णा ) आपल्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त, शिंत्रे कुटुंबियांच्या वतीने आपल्याला मनःपूर्वक, अभिनंदनपर व वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! मी पदवीधर झाल्यानंतर जेव्हा मुंबईत पदार्पण केलं, तेव्हा केवळ काही महिन्यांतच मला *पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळामध्ये* काम करण्याची संधी लाभली. त्या संधीने मला आपल्या कार्यपद्धतीचे, विचारांचे आणि नेतृत्वगुणांचे साक्षात दर्शन घडवले. आपली भाषणे ऐकताना एक गोष्ट मनावर खोलवर ठसली – एकीचा खरा अर्थ, कार्यसिद्धीसाठी लागणारी निष्ठा व चिकाटी, समाजसेवेची ओढ आणि शिक्षणाचे जीवनातील अमूल्य स्थान. त्या दिवसांपासूनच मी आपल्याला मनोमन गुरुरूपाने स्वीकारले. आपल्या विचारांचे अनुकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, अजूनही स्पष्ट, सडेतोड बोलण्याची आपली शैली, आरोग्याबाबतची शिस्त आणि वक्तशीर जीवनपद्धती – या काही बाबी माझ्या आचरणात यायला वेळ लागतो आहे, याची कल्पना मला आहे. आपण लहानपणापासून गरिबीचे चटके सोसत, अपार कष्ट सहन करत जेवढं शक्य होईल तेवढं शिक्षण गावामध्ये घेतलं. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठली आणि तेथे गिरणीत नोकरी स्...

पितृतुल्य दादांना विनम्र अभिवादन.

  आज २४ ऑगस्ट २०२६ — आमच्या शिंत्रे कुटुंबाचे कुटुंबप्रमुख, पितृतुल्य बाबू दादांची प्रथम पुण्यतिथी. आज दादांबद्दल काय लिहावं, हेच सुचत नाही… कारण दादा आता आमच्यात नाहीत, ही वस्तुस्थिती मनाला अजूनही स्वीकारता येत नाही. त्यांच्या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात आणि मन नकळत त्या जुन्या आठवणींच्या विश्वात हरवून जातं. सन १९५६ मध्ये आमच्या वडिलांचे अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. त्यावेळी दादांचं वय अवघं १४-१५ वर्षांचं असावं. हे वय होतं खेळण्याचं, बागडण्याचं आणि शिकण्याचं; पण नियतीने त्यांच्या हातातील पुस्तक काढून त्याऐवजी नांगर दिला आणि संपूर्ण कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या कोवळ्या खांद्यावर सोपवली.आई, आजी आणि आम्ही पाच बहीण-भावंडे—असं आमचं कुटुंब. येणाऱ्या संकटांना न घाबरता, परिस्थितीसमोर न झुकता, जिद्द, कष्ट, त्याग आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी नियतीलाच आव्हान दिलं आणि आमच्या कुटुंबाला उभं केलं. पुढे हाजगोळी येथील भादवणकर (देसाई) कुटुंबातील शारुबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांचं नाव लक्ष्मी ठेवण्यात आलं आणि खरंच, त्या दिवसापासून त्यांच्या र...

काळम्मा देवी- एक पर्यटन स्थळ

  *श्री काळम्मा देवी मंदिर व परिसर – पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पार्श्वभूमी* पेद्रेवाडी गावाच्या दक्षिणेस अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वसलेले श्री काळम्मा देवी मंदिर हे धार्मिक श्रद्धा, नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा यांचा सुंदर संगम आहे. मंदिरापासून डोंगराच्या चढाईला सुरुवात होते आणि पुढे संपूर्ण परिसर निसर्गाने मुक्तहस्ते उधळलेले सौंदर्य अनुभवायला मिळते. डोंगरावर सर्वत्र पसरलेल्या काळ्या दगडांच्या विशाल शिळा, त्यांच्या मधून नैसर्गिकरीत्या उगवलेली करवंदीची दाट झुडपे, विविध प्रकारची सदाहरित वनस्पती आणि पावसाळ्यात हिरवाईची चादर पांघरलेले डोंगर यामुळे हा परिसर अत्यंत रमणीय दिसतो. पावसाळ्याच्या दिवसांत धुक्याची दुलई, हिरव्यागार दऱ्या व खळखळणारे पाण्याचे प्रवाह यामुळे येथे आलेल्या प्रत्येक पर्यटकाला काश्मीरमधील एखाद्या नयनरम्य दरीत आल्याचा भास होतो. निसर्गप्रेमी, छायाचित्रकार, ट्रे कर्स आणि विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरू शकते. वसंत ऋतूच्या आगमनाने कोकिळांच्या मधुर 'कुहू कुहू' स्वरांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून जातो. त्यांच्या सुरेल किलबिलाटामुळे जणू एखादी ...

नवरत्नाचे शिरोमणी

  नवरत्नाचे शिरोमणी काही व्यक्तिमत्त्वे केवळ पदांमुळे नव्हे, तर आपल्या मूल्यांमुळे, कार्यसंस्कृतीमुळे आणि माणुसकीच्या जाणिवेमुळे इतिहासात अढळ स्थान मिळवतात. सन्माननीय श्री. एस. सी. मुडगेरीकर साहेब हे असेच एक नेतृत्व आहे-ज्यांचे नाव राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) या कंपनीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. नवरत्नाचा सुवर्णक्षण : एका तपश्चर्येचे फलित श्री. मुडगेरीकर साहेब यांची कारकीर्द म्हणजे आदर्श नेतृत्वाचा युगप्रवासच जणू!त्यांच्या सी.एम.डी. पदाच्या कार्यकाळात, आरसीएफच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात, भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रम विभागाकडून कंपनीला २९ ऑगस्ट २०२३ रोजी ‘नवरत्न’ पुरस्कार प्राप्त झाला- हा केवळ एक सन्मान नव्हता-तो आरसीएफच्या दीर्घ तपश्चर्येचा, शिस्तबद्ध प्रयत्नांचा आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा सुवर्णकळस होता. सर्व विभागीय संचालक, व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी- सर्वांच्या श्रमांना समान महत्त्व देणारे 'सर्वसमावेशक' नेतृत्व हेच त्यांच्या कार्यशैलीचे खरे वैशिष्ट्य ठरले. या यशामागे संपूर्ण कंपनीचे सामूहिक योगदान आहे, याची जाणीव त्यांनी ...