भव्य स्वागत कमान - आमच्या गावची शान.

पेद्रेवाडी उर्फ सुंदरवाडी गावाच्या दक्षिण प्रवेशद्वारावर आज उभी राहिलेली ही भव्य, आकर्षक आणि दिमाखदार स्वागत कमान म्हणजे केवळ एक वास्तू नसून गावाच्या एकोप्याचं, अभिमानाचं आणि सामूहिक श्रमांचं प्रतीक आहे. अनेक वर्षांपासून मनामध्ये जपलेलं एक सुंदर स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झालं आणि त्यामुळे पेद्रेवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.


या प्रेरणादायी कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आजी-माजी सैनिक व पोलीस संघटना, पेद्रेवाडी यांचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐                  
आपण सर्वांनी पोलीस आणि सैनिक क्षेत्राची निवड केली, हे केवळ नोकरी म्हणून नव्हे; तर देशसेवा आणि जनसेवा करण्यासाठी नियतीनेच आपल्या खांद्यावर दिलेली एक पवित्र जबाबदारी होती, असे म्हणावे लागेल. देशाच्या सुरक्षेसाठी आणि समाजाच्या सेवेसाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्यामुळे आपण सर्व खऱ्या अर्थाने सन्मानास पात्र आहात.

विशेष म्हणजे, आपण सर्वांनी स्वतःहून देणगी स्वरूपात निधी उभारून कोल्हापूर जिल्ह्यातील एक नंबरची स्वागत कमान उभी केली, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या कार्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून अथक परिश्रम घेणारे सर्वश्री लक्ष्मण गाडे, रामचंद्र डोंगरे, सखाराम तुरटे, रमेश कबीर, निवृत्ती देवरकर, शंकर जाधव, मारुती व्होडगे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे ग्रामस्थ या नात्याने मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या जिद्दीमुळे, चिकाटीमुळे आणि समर्पणामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.

या स्वागत कमानीसाठी पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ तसेच श्रम साफल्य सहकारी पतसंस्था, मुंबई यांनी दिलेला आर्थिक हातभारही तितकाच मोलाचा आहे. त्यामुळे ही वास्तू संपूर्ण पेद्रेवाडीकरांच्या अप्रत्यक्षपणे सामूहिक सहकार्यतून उभी राहिलेली अजरामर स्मृती आहे, असे अभिमानाने म्हणता येईल.

ही स्वागत कमान भविष्यात गावाच्या वैभवाची, एकतेची आणि विकासदृष्टीची साक्ष देत राहील. यापुढेही आपण सर्वांनी अशाच हिरीरीने विकासकामांमध्ये सहभाग घेऊन आपल्या हातून पेद्रेवाडी गावाची निरंतर समाजसेवा घडत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा👍👍

पुन्हा एकदा सर्व सेवाभावी सैनिक आणि पोलीस बंधू-भगिनींचं तसेच या कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन 💐💐

शुभेच्छूक

श्री. बाळासाहेब शिंत्रे
११ मे २०२६

Comments

Popular posts from this blog

ग्रामस्थ मंडळ व पतसंस्था वार्षिक सभा

🎶 हेमंतकुमार - अविस्मरणीय मैफल! 🎶

गणपतीपुळे पिकनिक : एक स्नेह संमेलन