शाही विवाहसोहळा आणि आध्यात्मिक यात्रा

 विवाहाचा आनंद, मैत्रीचा सुगंध आणि अध्यात्माचा दिव्य अनुभव!



श्री. सुधांशू देबनाथ हे आमच्या आरसीएफ एव्हरग्रीन ग्रुपचे निवृत्त असूनही तरुण, तडफदार आणि मनमिळाऊ सदस्य!
सौ. सुरुची त्याची मुलगी आज त्याच्या घरी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने माहेरी येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आज तिच्या स्वागताच्या निमित्ताने तिच्या लग्नाच्या सोहळ्या संबंधीचं माझं मनोगत प्रसारित करत आहे.
देबनाथ यांनी मे २०२६ मध्ये आपल्या कन्या सुरुचीच्या विवाहसोहळ्याचे आम्हाला प्रेमपूर्वक निमंत्रण दिले. त्यानुसार श्री. घाडगे साहेब, माने साहेब, दिवेकर साहेब, राजेंद्र जोशी, सुनील कवळे, एन. एम. पाटील, मी आणि माझी पत्नी रंजना लखनऊला रवाना झालो.
एका शाही विवाहसोहळ्यात सहभागी होण्याचा योग हा आमच्यासाठी आनंदाचा आणि आयुष्यभर स्मरणात राहील असा अनुभव ठरला. या विवाहाच्या निमित्ताने केवळ मंगलमय सोहळ्याचा आनंदच मिळाला नाही, तर जुन्या मित्रांचा सहवास, नव्या ओळखी, अविस्मरणीय क्षण आणि अयोध्या-काशीच्या आध्यात्मिक यात्रेचे पुण्यही लाभले. खऱ्या अर्थाने हा दुहेरी आनंदाचा ‘ दुग्धशर्करा योग’ होता!
या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने लखनऊमधील एका नामांकित आणि प्रतिष्ठित हॉटेलमध्ये आमच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथील निवासव्यवस्थेइतकीच जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्थाही अत्यंत उत्कृष्ट व प्रशंसनीय होती. प्रत्येक जेवणाच्या वेळी आणि नाश्त्याच्या वेळी वेगवेगळे मेनू ठेवण्यात आले होते. पदार्थांमध्ये इतकी विविधता होती की, काय खावे आणि काय खाऊ नये, असा प्रश्न आम्हाला पडत होता! एक पदार्थ चाखावा तर दुसरा त्याहून अधिक आकर्षक वाटत होता. एकंदरीत, या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने लाभलेली ही खाद्ययात्रा आमच्या लखनऊच्या आठवणींमध्ये विशेष स्थान मिळवून गेली.
सुरुचीच्या विवाहासाठी केलेली भव्य तयारी आणि प्रत्येक कार्यक्रमाचे केलेले उत्कृष्ट नियोजन पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो. सुमित, सुरुची, रोशनी आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्यांनी घेतलेले परिश्रम, दाखवलेले समर्पण आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी केलेली धडपड खरोखरच कौतुकास्पद होती.
तीन दिवस चाललेल्या या विवाहसोहळ्यात आनंद, उत्साह, संगीत आणि आपुलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. पहिल्या दिवशी परिचय समारंभ आणि कॉकटेल पार्टी, दुसऱ्या दिवशी हळदीचा समारंभ आणि संगीत, तर तिसऱ्या दिवशी मुख्य विवाहसोहळा, अशा प्रत्येक कार्यक्रमाची आखणी देखणी आणि शिस्तबद्ध होती.
राहण्याची आरामदायी व्यवस्था, स्वादिष्ट भोजनातील विविधता, भव्य सभागृहांची सजावट आणि पाहुण्यांच्या सोयीसाठी केलेल्या विशेष व्यवस्था या सर्व गोष्टी उच्च दर्जाच्या होत्या. मात्र, या सर्वांपेक्षाही मनाला भावली ती देबनाथ कुटुंबाची आत्मीयता!
इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहुणे उपस्थित असूनही देबनाथ यांच्या पत्नी आणि सुनेने प्रत्येक पाहुण्याची वैयक्तिक विचारपूस करून त्यांची प्रेमाने काळजी घेतली. त्यामुळे आम्ही केवळ निमंत्रित पाहुणे नसून त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहोत, अशी आपलेपणाची भावना मनात निर्माण झाली. मोठेपणा केवळ भव्य आयोजनात नसतो, तर प्रत्येक व्यक्तीला दिलेल्या प्रेमात आणि सन्मानात असतो, याचा प्रत्यय या सोहळ्यात आला.
विवाहसोहळ्यातील संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम विशेष रंगतदार ठरले. तरुण-तरुणी आणि लहान मुले संपूर्ण जोशात नृत्य करत होती. त्यांचा उत्साह पाहून आम्ही ७०-८० वर्षे वयाचे ज्येष्ठही आपले वय विसरून पुन्हा तरुण झाल्यासारखे त्यांच्यासोबत मनमुराद नाचलो!
विशेष म्हणजे, देबनाथ यांच्या पाचही भावांनी तरुणाईला लाजवेल असा नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमात अक्षरशः धमाल उडवून दिली. भावाभावांमधील प्रेम, एकमेकांना दिलेली साथ आणि आनंद व्यक्त करण्याची त्यांची पद्धत पाहून मन प्रसन्न झाले. देबनाथचे सर्व भाऊही गुणी असून त्यांच्यातील परस्पर प्रेम, आदर आणि एकोपा हा आदर्श कुटुंबाचा सुंदर नमुना आहे.
बंगाली परंपरेनुसार पार पडलेले विवाहविधीही अत्यंत सुंदर आणि सुबक पद्धतीने आयोजित केले होते. देबनाथ यांचे जावई आदित्य हेही अत्यंत ऊर्जावान, प्रेमळ आणि सहकार्यशील व्यक्तिमत्त्वाचे आहेत. सुरुची आणि आदित्य यांची जोडी लक्ष्मी-नारायणाच्या जोडीप्रमाणे सुंदर आणि लोभस वाटली. त्यांच्या नव्या संसारात प्रेम, विश्वास, सुख, समृद्धी आणि आनंद सदैव नांदो आणि त्यांचे सहजीवन उत्तरोत्तर अधिक सुंदर होत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
तसेच, देबनाथ यांच्या क्रीडाप्रेमी मित्रांशी भेटण्याचा आणि त्यांच्यासोबत गप्पा मारण्याचा योगही आला. या स्नेहमेळाव्यात देबनाथ यांचा “मिलते रहो, मिलाते रहो” हा संवाद केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसून त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे, याची प्रचिती आली.
लखनऊच्या खास शैलीतील चिकनकारी कुर्ते, झब्बे आणि महिलांसाठीचे आकर्षक पोशाख खरेदी करताना आणखी काही आनंददायी क्षण या प्रवासाच्या आठवणीत जमा झाले.
या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला अयोध्या आणि वाराणसी या दोन पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याचा योग आला. एका बाजूला विवाहाचा मंगलमय सोहळा, तर दुसऱ्या बाजूला प्रभू श्रीरामांचे दर्शन आणि काशीच्या आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव! आनंद आणि अध्यात्म यांचा असा सुंदर संगम आमच्यासाठी खरोखरच भाग्याचा ठरला.
अयोध्येनंतर वाराणसी अर्थात काशी येथेही जाऊन आलो. काशी ही भगवान शंकरांची नगरी, भारतीय अध्यात्माचे प्राचीन केंद्र आणि मोक्षभूमी म्हणून ओळखली जाते. गंगेच्या तीरावर वसलेल्या या नगरीत इतिहास, संस्कृती, श्रद्धा आणि जीवनाचे तत्त्वज्ञान यांचा अनोखा मिलाप पाहायला मिळाला.
वाराणसीच्या प्रवासात छोट्या नौकेतून गंगेच्या प्रवाहात विहार करत विविध घाटांचे दर्शन घेण्याचा अनुभव अत्यंत अविस्मरणीय ठरला.
वाराणसीच्या प्रवासातील सर्वांत संस्मरणीय क्षण म्हणजे दशाश्वमेध घाटावरील गंगा आरती!
सायंकाळच्या वेळी घाटावर पोहोचल्यावर गंगेच्या काठावर जमलेली भाविकांची गर्दी, नदीच्या पाण्यावर पडणारे मावळत्या सूर्याचे प्रतिबिंब आणि आरतीची आतुरतेने वाट पाहणारे असंख्य भाविक, हे चित्र पाहून मन अक्षरशः भारावून गेले.
गंगा आरती हा केवळ धार्मिक विधी नाही; ती निसर्गाप्रती कृतज्ञता, श्रद्धा, समर्पण आणि भारतीय संस्कृतीच्या चिरंतन परंपरेचे प्रतीक आहे. आरतीनंतर गंगेच्या प्रवाहात सोडलेल्या छोट्या दीपांमुळे पाण्यावर निर्माण होणारा प्रकाशाचा देखावा पाहताना मन भावविभोर झाले.
या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहताना मन आनंदाने भरून येते. एका बाजूला सुरुची आणि आदित्य यांच्या विवाहसोहळ्यातील आनंद, नृत्य-संगीताची धमाल, मित्रमंडळींचा सहवास आणि देबनाथ कुटुंबाचे प्रेमळ आदरातिथ्य होते; तर दुसऱ्या बाजूला अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे दर्शन, काशी विश्वनाथांचे आशीर्वाद, गंगेच्या घाटांचे जीवनदर्शन आणि गंगा आरतीचा दिव्य अनुभव होता.
या प्रवासाने आम्हाला आनंदाचे अनेक समृद्ध क्षण दिले, मैत्रीची नाती अधिक दृढ झाली आणि आध्यात्मिक समाधानाची अनमोल अनुभूतीही मिळाली.
गंगेच्या अविरत प्रवाहाप्रमाणे जीवन आनंदाने पुढे वाहत राहो, मनातील भक्तीचा दीप सदैव तेवत राहो आणि मैत्रीच्या नात्यांतील प्रेमाचा सुगंध असाच दरवळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
🙏 जय श्रीराम! हर हर महादेव! हर हर गंगे! 🙏

शब्दांकन
बाळासाहेब शिंत्रे

Comments

Popular posts from this blog

ग्रामस्थ मंडळ व पतसंस्था वार्षिक सभा

🎶 हेमंतकुमार - अविस्मरणीय मैफल! 🎶

गणपतीपुळे पिकनिक : एक स्नेह संमेलन