हम सात साथ - अनोखं गेट-टुगेदर

 जुलै 2026

 'हम सात साथ' – अविस्मरणीय फॅमिली गेट-टुगेदर

जवळपास पन्नास वर्षांपूर्वीची आमची ऑफिसमधील सहकारी मीना राव मुंबईत आली आणि तिच्या भेटीच्या निमित्ताने 'हम सात साथ' मित्रपरिवाराचे एक सुंदर फॅमिली गेट-टुगेदर नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन येथे आयोजित करण्यात आले. अनेक वर्षांनंतर सगळे कुटुंबासह एकत्र आल्यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि आपुलकी होती.
एकत्र लंचचा आस्वाद घेत घेत १९७७ च्या काळातील ऑफिसमधील आठवणींना उजाळा मिळाला. एक्स्पान्शन अकाउंट सेक्शन मध्ये त्या काळात कोणकोण सहकारी होते, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांपासून ते कार्यालयातील अनेक गमतीदार प्रसंगांपर्यंत सर्व आठवणी पुन्हा एकदा जिवंत झाल्या. जणू काळाचे चाक पन्नास वर्षे मागे फिरले होते.
मीना राव आणि आमच्या महिला मंडळाच्या गप्पा तर विशेषच रंगल्या. एकेक आठवण निघत गेली आणि हास्याचे फवारे उडत राहिले. भावे बऱ्याच वर्षापासून सुचवत असलेले फॅमिली गेट-टुगेदर प्रत्यक्षात साकार झाल्यामुळे सौ. भावे यांच्या चेहऱ्यावरही समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता.
या आनंदी सोहळ्यात मात्र श्री. ढाके यांच्या कुटुंबाची उणीव सर्वांनाच जाणवली. ते असते तर या मैफलीत आणखी रंग भरला असता, अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती.
क्लबमध्ये आजूबाजूला अनेक ग्रुप्स एकत्र आले होते. सर्वत्र गप्पा, हास्यकल्लोळ आणि उत्साहाचे वातावरण असल्याने एकमेकांशी बोलण्यासाठी आवाज चढवून बोलावे लागत होते. पण त्या गोंधळातही आमच्या मैत्रीची मैफल तितक्याच रंगात रंगली. खऱ्या अर्थाने ही "गोंधळातला आनंद" अनुभवणारी स्पायसी पार्टी ठरली.
चार-पाच तास कसे सरले हे कोणालाच कळले नाही. मीना रावच्या उपस्थितीमुळे या भेटीला एक वेगळीच ऊब लाभली. त्यामुळे या संस्मरणीय फॅमिली गेट-टुगेदरचे श्रेय नक्कीच तिलाच जाते.
शेवटी, आपण असेच वेळोवेळी भेटत राहायचे, जुन्या आठवणी जपत उर्वरित आयुष्य आनंदाने आणि मैत्रीच्या सहवासात व्यतीत करायचे, असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. मीना रावला तिच्या परदेश प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देऊन, पुन्हा लवकरच भेटण्याचे आश्वासन देत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
खरोखरच, काही मैत्री काळाच्या ओघात कमी होत नाही; उलट प्रत्येक भेटीत ती अधिकच बहरत जाते.

बाळासाहेब शिंत्रे

अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी  मीना राव मुंबईत आल्यामुळे कर्जत येथे सगुना भाग येथे आमची पिकनिक आयोजित केली होती. त्याचं वर्णन मी त्यावेळी खालील शब्दात केले होते.

आर.सी.एफ. कंपनीमध्ये जे कर्मचारी किंवा अधिकारी नोकरीला लागले ते खरंच भाग्यवान! कारण
आमच्या कंपनीनीने जे काही दिलं ते शब्दात सांगणे कठीण! आर.सी.एफ. म्हणजे *रियल क्लोज फॅमिली* असा एकदा एका सीएमडीने उल्लेख केला होता. खरंच आर.सी.एफ. हा एक परिवार आहे आणि त्याचं सहकुटुंब गेटटुगेदर दर वर्षाच्या सुरुवातीलाच पार पडते. तिथे सर्वजण आपआपल्या सहकाऱ्यांना भेटून सुखदुःखाची देवाण-घेवाण करून मन मोकळं करतात. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आम्ही कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल मैत्रीचा पन्नासावा ॲनिवरसरी केक कापून साजरा केला.
     आम्ही सात जणांनी म्हणजे मी, मीना राव, मीना अरदकर, जोशी, ढाके, भावे आणि देबनाथ सगुना बाग येथे एक दिवसीय पिकनिक आयोजित केली. त्या अनुषंगाने माझे दोन शब्द...
       पन्नास वर्षांपूर्वी आम्ही आर.सी.एफ. ला नोकरीला लागल्यानंतर एक्सपान्शन अकाउंट या सेक्शनमध्ये जवळपास २० ते २२ जण आयताकृती हाॅलमध्ये समोरासमोर बसून काम करत असायचे. एका बाजूला दोन सेक्शन इन्चार्ज ( कै. भारतन व कै. सिन्हा) बसत. कालच्या पिकनिकच्या निमित्ताने पन्नास वर्षांपूर्वीची ती आसन व्यवस्था डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहीली आणि माझं मन त्यावेळच्या गप्पा गोष्टींचा कानोसा घेऊ लागले. मी माझे दोन शब्द लिहिण्यापूर्वी आमचे जे एक्सपान्शन अकाउंट सेक्शनमधले सहकारी आम्हाला सोडून कायमचे निघून गेले त्यांना मनःपूर्वक भावपूर्ण आदरांजली वाहतो.
      मीना नाईक म्हणजे आताची मीना राव थोडी उशिरा यायची. ती एकदा ऑफिसमध्ये आली की गप्पांना सुरुवात व्हायची. येताना वाटेत काय काय घडलं किवा कालपासून काय काय घडलं ते ती मस्त वर्णन करून सांगायची. तीच्या  उजव्या बाजूला मी आणि समोरच्या बाजूला जोशी आणि लागू बसत. त्यामुळे आम्ही तिघे- चौघे तिचे good listener होतो.आमच्यामध्ये जोशी हे सगळ्यांचे चिमटे घेण्यामध्ये उस्ताद होता आणि आजही आहे. त्यामुळे मध्येच श्री. जोशी त्याच्या विनोदी बुध्दीने हळूच असं काही बोलायचा की सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचा, त्यामुळे चर्चेला अजूनच रंगत यायची.श्री. पी.एस. कुलकर्णी हे मध्ये मध्ये विनोद बुद्धी ने कॉमेंट्स पास करायचे. फायनान्स मध्ये कोण कसा बोलतो किंवा बोलते हे ते हावभावासहीत तंतोतंत सांगायचे. आम्ही त्याना आधुनिक पु.ल. म्हणत असू.  कै दातार हे पुणेरी बोचर्‍या प्रतिक्रियेबद्दल प्रचलित होते. मी, भावे आणि ढाके श्रोत्यांच्या भूमिकेत राहून स्मितहास्य करायचे एवढंच! हॉलच्या दुसऱ्या बाजूला कै. नरियानी बसलेले असायचे. त्यांचे सगळे ड्रेस एकदम टकाटक असायचे. त्यांच्या बाजूला सौ. मीना अरडकर स्टेनोग्राफर आणि डाबरे कॉम्टीस्ट बसायचे. काही काळासाठी श्री. बहाडकर स्टेनोग्राफर होते. श्री. सुब्रमण्यम (मनी) आणि कै. ऊनी हे बाजुलाच असणार्‍या केबिनमध्ये बसायचे. कै.पेडणेकर हे मितभाषी आणि एकदम डीव्होटेड होते.  कै. वर्गीस हे दुसऱ्या केबिनमध्ये असायचे. एका शब्दात सांगायचं तर 'हसत खेळत कामकाज' चालत असुनही बाकी सेक्शननी आमच्या सेक्शनचा आदर्श घ्यावा असं होतं. एकजूट होती, एकमेकांबद्दलची जवळीक होती. आदर होता आणि साथ होती आणि आजही ती टिकवून असल्यामुळेच *हम सात* काल एकत्र भेटलो
   माझ्या बाजूला कै.तिलवाणी आणि हॉलच्या मधोमध मीना नाईक (राव ) बसायची. तिच्या बोलक्या स्वभावामुळे सर्व सेक्शनचे लक्ष केंद्रित करून घ्यायची. एकदा तर ती ऑफिसमध्ये अक्षरश: रडतच आली. आम्ही सगळे घाबरून गेलो. नंतर तिच्याकडून असं समजलं की, अचानक जोराचा पाऊस  पडल्यामुळे कमरेएवढ्या पाण्यातून तिला यावं लागलं. आम्ही तिची कशीतरी समजूत काढून तीला गरमागरम चहा पाजला. मीना जरी बडबडी होती तरी तिचे काम ती चोखपणे पार पाडायची पण नाही म्हटलं, तरी आमच्या कामावर थोडाफार परिणाम व्हायचाच आणि आमच्या साहेबांकडून सौम्य भाषेतला ओरडा खावा लागायचा. आमच्या प्रत्येकाचे स्वभाव जरी वेगळे होते, तरी सुरुवातीच्या  काही वर्षांतच आमचं एक आपुलकीचं आगळंवेगळं नातं तयार झालं, ते अजूनही तसंच घट्ट टिकून आहे, याचा प्रत्यय कालच्या पिकनिकला आला,  कारण मिना नाईक (राव)  ही बंगलोरहून फ्लाईटने येऊन आपल्या पिकनिकला हजर राहून सगळ्यांना फ्रेंडशिप करन्सी भरून एक एक पाकीट देऊन मित्रत्वाची आठवण टिकवली.
      या ठिकाणी अजून एक खास उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे कै. खत्री साहेबांचा. खत्री साहेबा हे मी, जोशी आणि ढाके  आम्हा तिघांना 'थ्री माॅस्कीटीएर्स' असा उल्लेख करायचे. आम्ही जुनिअर असताना सुद्धा गव्हर्मेंट ऑडिटर आणि स्टॅच्युटरी ऑडिटर यांना अटेंड  करण्यासाठी आम्हाला त्यांनी संधी दिली. खत्री साहेबांचा दरारा एवढा होता की कोणी सिंधी मित्र त्यांना भेटण्यासाठी आला तर आमच्याकडून अगोदर अंदाज काढायचे. आमची तिघांची टाईम ऑफिसची बदली थांबवण्यामध्ये त्यांचा फार मोठा हात होता. त्याची चर्चा सर्व ट्रॉम्बे  युनिटभर होत होती.
     त्यावेळी सगळा चलित चित्रपट डोळ्यासमोर उभा राहिला. कालचा दिवस फारच मजेत गेला. विशेष म्हणजे ढाकेनी या पिकनिकला स्वयंस्फूर्त तयारी दर्शविली त्यामुळे आमच्या आनंदात अजूनच भर पडली.
आमच्या सेक्शनमध्ये थोडे उशिरा जाॅईन झालेले आणि वयानी सगळ्यात लहान असलेले देबनाथ यांनी काल आमचं सारथ्य केलं आणि जोशी प्रमाणे ते ही चिरतरुण असल्यामुळे सगळ्यांना कंटाळा न येऊ देण्यास हातभार लावत सुखरुप घरी आणले.
    मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो...सहवासातील माणसाचं देखील असंच असतं...शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं...

शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो...आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!!

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.
आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?
नशिबानं कधी भेटलीच तर हळुवारपणे जतन करून ठेवावीत... म्हणूनच काल या नवीन वर्षाच्या निमित्ताने संकल्प सोडला आहे की 'वरचेवर मित्रांना भेटत जाऊन आपलं  राहिलेलं आयुष्य आनंदात जगूया.' 
आपला
बाळासाहेब शिंत्रे


Comments

Popular posts from this blog

ग्रामस्थ मंडळ व पतसंस्था वार्षिक सभा

🎶 हेमंतकुमार - अविस्मरणीय मैफल! 🎶

गणपतीपुळे पिकनिक : एक स्नेह संमेलन