नातू रिधानला वाढदिवस शुभाशीर्वाद
ऑगस्ट २०२५ मधील मलेशियातील एक प्रसंग आजही माझ्या मनात ताजा आहे. मी, माझी पत्नी, सौ. रंजना, मुलगी हर्षदा आणि नातवंडे नित्या व नैतिक असे आम्ही सर्वजण मलेशियाला गेलो होतो. विमानतळावरून माझा मुलगा मिलिंद याच्या राहत्या टॉवरजवळ पोहोचल्यानंतर मी गाडीतून आधी उतरलो, तर मिलिंद गाडी पार्क करण्यासाठी पुढे गेला.
तेवढ्यात माझे लक्ष टॉवरमधून बाहेर येणारा माझा नातू रिधान आणि सून रसिका यांच्याकडे गेले. मला पाहताच रिधान धावत सुटला. जसजसा तो जवळ येत होता, तसतसा त्याचा वेग वाढत होता. अखेर माझ्याजवळ येताच त्याने आनंदाने “बाबा!” अशी हाक मारली आणि मला घट्ट मिठी मारली. त्याच्या त्या निरागस धावण्यातून आणि प्रेमळ मिठीतून व्यक्त झालेला आनंद शब्दांत सांगता येणार नाही. नातवाच्या प्रेमाची ती अविस्मरणीय अनुभूती माझ्या हृदयात कायमची कोरली गेली.
❤️ रिधानच्या निरागसतेला समर्पित काही ओळी! ❤️
दोन पिढ्यांमधील अंतर, प्रेमाचा धागा जोडतो,
आमच्या सुरकुतलेल्या हातांत, त्याचा इवलासा हात असतो!
त्याच्या निरागस हास्यात, आमचं बालपण फुलतं,
त्याच्या प्रत्येक हट्टामधून, प्रेम नव्यानं उमलतं!
त्याच्या एका हाकेसाठी, सारं जग बाजूला ठेवतो,
त्याच्या छोट्याशा मिठीत, आयुष्यभराचा आनंद शोधतो!
त्याच्या बोबड्या बोलांत, मन आमचं हरवून जातं,
त्याच्या प्रत्येक खोडीत, आमचं बालपण पुन्हा बहरतं!
❤️ प्रिय रिधान, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ❤️
तुझ्या बाललीला, निरागस गप्पा, गोड खोड्या आणि प्रेमळ मिठ्या हाच आता आमच्या रोजच्या आनंदाचा अनमोल ठेवा आहे. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम खुलत राहो आणि तुझ्या आयुष्यात आनंदाचे असंख्य क्षण येत राहोत.
तुला उत्तम आरोग्य, भरपूर आनंद, दर्जेदार शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य लाभो. तू आयुष्यात खूप मोठा हो, तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत, हीच देवाकडे मनापासून प्रार्थना!
रिधान, तुला पाचव्या वाढदिवसानिमित्त आई-बाबांकडून भरभरून प्रेम, मनःपूर्वक शुभेच्छा आणि अनंत शुभाशीर्वाद! 🎂🎁❤️
— बाबा बाळासाहेब आणि आई रंजना ❤️


Comments
Post a Comment