गपपतीपुळे पिकनिक : एक स्नेह संमेलन - एप्रिल २०२५
कोकण म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक अद्वितीय , आल्हाददायक स्वप्न – हे तर आपल्याला माहितच आहे . अशा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी एखादी पिकनिक काढावी अशी सूचना एका लग्नाच्या निमित्ताने जमलेल्या ग्रामस्थ महिलांच्याकडून आली आणि त्या गोष्टीचा सुतोवाच मी १६ मार्च २०२५ रोजी पेद्रेवाडी ग्रामस्थ रहिवासी संघाच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी केला . त्यावेळी गणपतीपुळेच्या पिकनिकच्या नियोजनाची जबाबदारी वसंत शिंत्रे , गोविंद आजगेकर , आबा शिंत्रे , प्रकाश डोंगरे आणि शिवाजी रेडेकर यांनी स्वीकारली . आपसात विचारविनिमय करून , अखेर ४ एप्रिल २०२५ रोजी रात्री वातानुकूलीत बसने आमचा कोकणचा प्रवास सुरू झाला . खांदा कॉलनी ओलांडल्यानंतर आमच्या अंताक्षरीचा शुभारंभ झाला . त्यावेळी महिलांचे पाठांतर वाखाणण्याजोगे होते . प्रकाश डोंगरेच्या अस्सल गावरान कविता ऐकून सर्वांचीच चांगली करमणूक झाली . कोकणचं सृष्टी सौंदर्य म्हणजे निसर्गाने रंगवलेलं एक जिवंत चित्रच जणू ! तिथले हिरवेगार डोंगर म्हणजे निसर्गाची म...