कौतुकाची थाप, प्रेरणेचा ठेवा!
आमच्या एव्हरग्रीन ग्रुपचे ग्रुप लीडर, आदरणीय श्री. घाडगे साहेब दीर्घ कालावधीनंतर अमेरिकेहून मुंबईत परत येत आहेत, ही बातमी ऐकून संपूर्ण ग्रुपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. घाडगे साहेब मुंबईत असले की आमच्या गेट-टुगेदरच्या पार्ट्यांचे प्रमाण वाढलेले असते! त्यांच्या उत्साही सहवासामुळे आमच्या भेटीगाठींना एक वेगळीच मजा आणि आनंद मिळतो. त्यांच्या या स्वगृही पुनरागमनाचे मनःपूर्वक स्वागत! 💐
अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे, प्रत्येक स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व, तेथील वैशिष्ट्ये आणि स्वतः अनुभवलेला आनंद यांचे सुंदर शब्दांत वर्णन करून ते मला वेळोवेळी पाठवत असत. त्यांच्या या अनुभवसंपन्न लेखनातून इतरांनाही अमेरिकेची सफर घडते. त्यांच्या या लेखनाचा उपयोग करून ‘अमेरिकेतील भटकंती’ या विषयावर एक माहितीपूर्ण पुस्तिका तयार करावी आणि अमेरिकेला जाणाऱ्या आपल्या मित्रांना संदर्भासाठी द्यावी, अशी सूचना मी त्यांना केली आहे. त्यांच्या अनुभवांचा हा ठेवा निश्चितच अनेकांसाठी उपयुक्त ठरेल.माझ्या ‘जीवन तरंग’ या वेबसाईटची माहिती मी १५ ऑगस्ट २०२६ रोजी इतर मित्रांप्रमाणेच घाडगे साहेबांनाही दिली होती. मात्र, त्यांचे एक विशेष वैशिष्ट्य मला आवर्जून नमूद करावेसे वाटते ते म्हणजे त्यांनी माझ्या वेबसाईटवरील प्रत्येक पान बारकाईने वाचले, त्यातील तपशील समजून घेतले आणि वेळोवेळी आपली सकारात्मक मते व मौल्यवान सूचना मला कळवल्या. त्यांच्या या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा, साहित्यिक जाणिवेचा आणि प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा मला मनापासून आनंद झाला.
आपल्या कामाचे कौतुक करणारे अनेकजण भेटतात; पण आपले लेखन इतक्या बारकाईने वाचून त्यातील गुण-दोष समजून घेत सकारात्मक मार्गदर्शन करणारी माणसे विरळाच असतात.
त्यांच्या अभिप्रायामुळे मन जुन्या आठवणींत रमले. आरसीएफच्या मार्केटिंग फायनान्स विभागातील दिवस डोळ्यांसमोर उभे राहिले. मार्केटिंग फायनान्स विभागाचे एचओडी श्री. घाडगे साहेब यांच्याकडे मी रिपोर्टिंग करत असताना काम करून घेण्याची त्यांची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण होती. दररोजच्या मीटिंगची सुरुवात ते कार्यालयीन कामाच्या आढाव्याने न करता कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चौकशी करून करत असत.
‘कुटुंबासाठी किती वेळ देता? आरोग्यासाठी योगासने किंवा प्राणायाम करता का?’ अशा प्रश्नांतून ते सहकाऱ्यांच्या कुटुंबाची आणि आरोग्याची काळजी घेत असत. त्यांच्या दृष्टीने कर्मचारी हा केवळ काम करणारा घटक नव्हता, तर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक अडचणी असलेला माणूस होता. एखाद्या कर्मचाऱ्यावर अन्याय होत असेल किंवा बदलीसारखा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते ठामपणे पाठीशी उभे राहत असत.
घाडगे साहेब आरसीएफमधून जनरल मॅनेजर (फायनान्स) या पदावरून निवृत्त झाले.
माझ्या ‘जीवन तरंग’ वेबसाईटवरील लेखनाबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांबरोबरच ‘विचारमंच’ या ब्लॉगवरील प्रत्येक लेखाच्या शेवटी नोंदवलेल्या त्यांच्या कॉमेंट्स माझ्यासाठी अत्यंत मोलाच्या आहेत.
आयुष्याच्या प्रवासात काही व्यक्ती आपल्या विचारांना दिशा देतात, प्रयत्नांना प्रोत्साहन देतात आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवतात. श्री घाडगे साहेब हे माझ्यासाठी अशाच गुरुतुल्य व्यक्ती आहेत. त्यांच्या सहवासातून मिळालेले मार्गदर्शन आणि आजही कायम असलेला स्नेह माझ्यासाठी अनमोल आहे.

🪴धन्यवाद बाळासाहेब .😊🙏🏻
ReplyDelete