काळम्मा देवी- एक पर्यटन स्थळ
*श्री काळम्मा देवी मंदिर व परिसर – पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पार्श्वभूमी*
पेद्रेवाडी गावाच्या दक्षिणेस अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वसलेले श्री काळम्मा देवी मंदिर हे धार्मिक श्रद्धा, नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा यांचा सुंदर संगम आहे. मंदिरापासून डोंगराच्या चढाईला सुरुवात होते आणि पुढे संपूर्ण परिसर निसर्गाने मुक्तहस्ते उधळलेले सौंदर्य अनुभवायला मिळते.
डोंगरावर सर्वत्र पसरलेल्या काळ्या दगडांच्या विशाल शिळा, त्यांच्या मधून नैसर्गिकरीत्या उगवलेली करवंदीची दाट झुडपे, विविध प्रकारची सदाहरित वनस्पती आणि पावसाळ्यात हिरवाईची चादर पांघरलेले डोंगर यामुळे हा परिसर अत्यंत रमणीय दिसतो. पावसाळ्याच्या दिवसांत धुक्याची दुलई, हिरव्यागार दऱ्या व खळखळणारे पाण्याचे प्रवाह यामुळे येथे आलेल्या प्रत्येक पर्यटकाला काश्मीरमधील एखाद्या नयनरम्य दरीत आल्याचा भास होतो. निसर्गप्रेमी, छायाचित्रकार, ट्रेकर्स आणि विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरू शकते. वसंत ऋतूच्या आगमनाने कोकिळांच्या मधुर 'कुहू कुहू' स्वरांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून जातो. त्यांच्या सुरेल किलबिलाटामुळे जणू एखादी गायन स्पर्धाच रंगली आहे, असा मनमोहक भास निर्माण होतो.
या मंदिराचा जीर्णोद्धार हा ग्रामएकतेचा प्रेरणादायी आदर्श आहे. गावातील काही सैनिकांनी वर्गणी काढून मंदिराची डागडुजी केली. त्याच संकल्पनेचा धागा पुढे नेत पेद्रेवाडीतील ग्रामस्थ तसेच मुंबईस्थित ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुमारे २० लाख रुपयांचा निधी उभारला. या निधीतून आजचे भव्य, देखणे आणि प्रशस्त मंदिर उभारण्यात आले. त्यानंतर १५ मे २०१५ रोजी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. त्यावेळेस काळम्मा देवीच्या बाजुलाच भगवान शंकरांची पिंडी स्थापित असून, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे.
मंदिराच्या सभोवती दाट आणि उंच वृक्षराजी असल्यामुळे संध्याकाळ होताच परिसरातील असंख्य पक्षी येथे एकत्र जमतात. त्यांच्या मधुर किलबिलाटाने संपूर्ण परिसर भारावून जातो. त्या वेळी डोळे मिटून शांतपणे बसल्यास जणू काही भक्तिमय भजन सुरू असल्याचा दिव्य अनुभव येतो. मंदिराच्या पाठीमागे नागदेवतेचे एक छोटेसे पण श्रद्धास्थान असलेले मंदिरही आहे.
दरवर्षी येथे मंदिराचा वर्धापन दिन आणि महाशिवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जातो. तसेच दसऱ्याच्या दिवशी पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा आणि सोने लुटण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यानंतर देवीची पालखी गावभर वाजत-गाजत मिरवणुकीने फिरवली जाते. या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्याचप्रमाणे, श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी सौभाग्यवती महिला देवीची ओटी भरण्यासाठी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने मंदिरात गर्दी करतात. हे मंदिर ग्रामस्थांच्या श्रद्धा, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत प्रतीक आहे.
तालुक्यातील अनेक शाळा दरवर्षी एकदिवसीय वनभोजन, निसर्गभ्रमण आणि शैक्षणिक सहलींसाठी या ठिकाणाची निवड करतात. विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळीक साधण्याची, पर्यावरणाचे महत्त्व समजून घेण्याची आणि ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेण्याची ही एक उत्तम संधी ठरते.
मंदिरालगत वर्षभर वाहणारा ओढा या परिसराच्या निसर्गसौंदर्यात अधिकच भर घालतो. त्याच परिसरात असलेल्या नैसर्गिक झऱ्याचे पाणी अत्यंत स्वच्छ, निर्मळ आणि शीतल असून त्याच्या शुद्धतेची विशेष ख्याती आहे. या झऱ्यावर दिवसा चरायला आलेली गुरे पाणी पितात, तर रात्री जंगलातील वन्य प्राणीही येथे येऊन आपली तहान भागवतात. त्यामुळे हा परिसर निसर्ग आणि वन्यजीव यांचा सुंदर संगम अनुभवण्याचे ठिकाण ठरतो.स्वच्छ, शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरणामुळे येथे येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना मानसिक समाधान आणि प्रसन्नतेचा अनोखा अनुभव मिळतो.
या देवस्थानाला पौराणिक श्रद्धेचा आधार आहे. मंदिरालगत असलेल्या दगडी शिळेवर पांडवकालीन देव-देवतांच्या पावलांच्या खुणा असल्याची स्थानिकांची श्रद्धा आजही कायम आहे. पेद्रेवाडीच्या डोंगररांगांचा रक्षणकर्ता म्हणून श्री काळम्मा देवीचा गौरव केला जातो. मंदिराला चार-पाचशे वर्षापूर्वीच्या एका विशाल आंब्याच्या वृक्षाचे नैसर्गिक छत्र लाभले आहे.
मंदिराचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी मंदिर परिसरातील या झाडावरील मधमाशांची पोळी जणू जागृत देवस्थानाची साक्ष देतात. ग्रामस्थांच्या अनुभवाप्रमाणे, अनावधानाने एखाद्याकडून मंदिराच्या पावित्र्याला बाधा पोहोचेल असे कृत्य घडल्यास मधमाशा त्याच्यावर हल्ला करतात. त्यामुळे या देवस्थानाविषयी ग्रामस्थांच्या मनात विशेष श्रद्धा आणि आदर आहे.
मनोभावे प्रार्थना करणाऱ्या भाविकांच्या नवसाला देवी पावते, अशी परिसरातील जनमानसाची दृढ श्रद्धा आहे.
धार्मिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, ट्रेकिंग, पर्यावरण शिक्षण आणि ग्रामीण पर्यटन या सर्व दृष्टीने श्री काळम्मा देवी मंदिर व परिसरात मोठी क्षमता आहे. शासनाने आवश्यक पायाभूत सुविधा, सुशोभीकरण, प्रवेशमार्ग, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, माहिती फलक, वाहनतळ आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून हा परिसर अधिक विकसित केल्यास तो चार-पाच तालुक्यांतील पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र ठरू शकतो.
शासनाने या ठिकाणाचा सर्वांगीण विचार करून "श्री काळम्मा देवी मंदिर व परिसर" यास अधिकृत पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा. त्यामुळे या परिसरातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन होईल, स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि भविष्यात हा परिसर कोकणातील एक आदर्श धार्मिक-निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकेल.
Comments
Post a Comment