गपपतीपुळे पिकनिक : एक स्नेह संमेलन - एप्रिल २०२५

 

कोकण म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक अद्वितीय, आल्हाददायक स्वप्नहे तर आपल्याला माहितच आहे. अशा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी एखादी पिकनिक काढावी अशी सूचना एका लग्नाच्या निमित्ताने जमलेल्या ग्रामस्थ महिलांच्याकडून आली आणि त्या गोष्टीचा सुतोवाच मी १६ मार्च २०२५ रोजी पेद्रेवाडी ग्रामस्थ रहिवासी संघाच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी केला. त्यावेळी गणपतीपुळेच्या पिकनिकच्या नियोजनाची जबाबदारी वसंत शिंत्रे, गोविंद आजगेकर, आबा शिंत्रे, प्रकाश डोंगरे आणि शिवाजी रेडेकर यांनी स्वीकारली.  आपसात विचारविनिमय करून, अखेर एप्रिल २०२५ रोजी रात्री वातानुकूलीत बसने आमचा कोकणचा प्रवास सुरू झाला.खांदा कॉलनी ओलांडल्यानंतर आमच्या अंताक्षरीचा शुभारंभ झाला. त्यावेळी महिलांचे पाठांतर वाखाणण्याजोगे होते. प्रकाश डोंगरेच्या  अस्सल गावरान कविता ऐकून सर्वांचीच चांगली करमणूक झाली.

कोकणचं सृष्टी सौंदर्य म्हणजे निसर्गाने रंगवलेलं एक जिवंत चित्रच जणू! तिथले हिरवेगार डोंगर म्हणजे निसर्गाची मखमली चादर, तर संथ वाहणाऱ्या नद्या म्हणजे तिच्या ओठांवरचे मंद, मधाळ हसू. कोकणातल्या नारळ आणि आंब्याच्या बागा म्हणजे सुवासिक अलंकार, ज्यांनी निसर्ग स्वतःला सजवलंय हे सगळं आम्ही प्रत्यक्ष अनुभवत प्रवास करत होतो.

सकाळच्या कुंद धुक्यांतून डोकावणारा सूर्य म्हणजे सुवर्ण मुकुट घातलेला राजा, तर संध्याकाळच्या सागरकिनाऱ्यावरचं सूर्यास्ताचं दृश्य म्हणजे निसर्गाने रंगवलेलं एक अलौकिक चित्र. समुद्राच्या लाटांचा आवाज म्हणजे निसर्गाची गूढ संगीतातली सूरावटी, जी मनात शांततेचा झरा उगम पावते हे सगळं डोळे भरून न्याहाळताना स्वतःला विसरून गेलो आणि मन कविता गुणगुणू लागलं..

कोकण हा निसर्गाचा गंधी श्वास,

हिरवाईने सजलेला पृथ्वीचा भास।

डोंगर दर्यांतुनी वाहती वारा,

फुलांनी नटलेली धरतीची कारा।

सागर किनाऱ्यावर सूर्याचं हास्य,

लाटांतून उधळून निघालेलं नृत्य।

नारळ, पोफळींच्या ओंजळी सावल्या,

आंब्याच्या फांद्यांतुन गोड आठवणींच्या चाहुल्या।

शेतीत मातीचा सुवास दरवळे,

आभाळही येथे रंगात न्हाले।

वेळू काठ्याचं गाणं, पक्ष्यांची साद,

प्रत्येक क्षण इथे जणू नव्याने जिवंत होत जाद।

कोकण म्हणजे मायाळू स्पर्श निसर्गाचा,

प्रेमाने भरलेला प्रत्येक श्वास त्याचा।

शब्दांत सांगता येईल जे सौंदर्य,

ते अनुभवायला लागते इथलं सांदण्य।

आमच्या प्रवासाची सुरुवात मार्लेश्वराचे दर्शन घेऊन झाली. वाटेत श्री. नाफडे यांनी त्यांच्या घरच्या आंब्याचं पनं देवून केलेलं स्वागत मनाला भावलं. त्यामुळे ड्रायव्हरने रस्ता चुकवल्याचे विचार कुठच्या कुठं पळून गेले आणि कोकणातील वेगळ्याच अनुभवांकडे लक्ष केंद्रित झालं. सह्याद्रीच्या रांगांचं मनोहारी सौंदर्य अनुभवत आम्ही मार्लेश्वरला पोहोचलो.

मार्लेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी ४५० पायऱ्या चढाव्या लागल्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच दम लागला. सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेले हे गुहामंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले असून प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिरात भगवान शंकराची स्वयंभू पिंड आहे आणि मंदिराच्या सभोवताली घनदाट जंगल पसरले आहे. विशेषतः मंदिराच्या छतावरून पाण्याचे थेंब सतत शिवलिंगावर पडत असतात, हे दृश्य अत्यंत आध्यात्मिक मनमोहक वाटते.

मार्लेश्वर दर्शनानंतर पायथ्याशी जेवण आटोपून आम्ही आरे-वारे बीचला एक धावती भेट दिली आणि नंतर गणपतीपुळेच्या बीचवर पोहोचलो. तिथे जवळपास दीड तास समुद्राच्या लाटांमध्ये मनसोक्त भिजत समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद घेतला.जलक्रीडा, बोटींग आणि सूर्यास्त पाहत असलेले पर्यटक खऱ्या अर्थाने आनंदात हरवले होते. तो उत्साह अनुभवण्यासारखा होता. त्या रात्री गणपतीपुळे येथे मुक्काम केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही श्री गणपतीचे दर्शन घेतले. गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक खूपच प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटकांचे आकर्षक ठिकाण आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहे. येथील स्वयंभू गणपतीची मूर्ती नैसर्गिकरित्या निर्माण झालेली असून ती पश्चिमाभिमुख आहे, जे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, निळेशार पाणी आणि तिथला शांतीदायक वातावरण मनाला खूपच आनंद देणारे होते.

गणपतीपुळे येथे नाश्ता करून आम्ही पावस येथील मठाकडे प्रस्थान केले. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे, आम्ही अगदी बारा वाजता मठात पोहोचलो. तो दिवस रामनवमीचा असल्याने आणि बारा वाजताची आरती सुरू होण्याची वेळ असल्याने, हा योग खरंच दुग्धशर्करा संयोग ठरला.हा मठ विशेषतः स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. ते एक थोर संत आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी याच ठिकाणी राहून अनेक भक्तांना अध्यात्माची वाट दाखवली. मठाचा परिसर अत्यंत शांत, निसर्गरम्य असून ध्यान, सेवा आणि साधनेसाठी आदर्श आहे. येथे दररोज होणाऱ्या पूजा, आरती आणि प्रवचनांचा भक्तांवर गहिरा प्रभाव पडतो. आरतीनंतर आम्ही तेथील चविष्ट महाप्रसादाचा लाभ घेतला आणि परतीच्या प्रवासासाठी निघालो आणि वाटेत येणाऱ्या डेरवणला पोहोचलो.

डेरवण हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे शिवस्मारक आणि शिवकालीन युद्धस्मृती संग्रहालय, ज्यामुळे या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व अधिकच वाढते. हे संग्रहालय म्हणजे एक प्रकारचे युद्धस्मृती मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना लढायांचे चित्ररूप सादरीकरण येथे केले आहे. शिवाजी महाराजांचा जन्म, अफझलखान वध, राज्याभिषेक यांसारख्या प्रसंगांचे भव्य शिल्पांतून दर्शन होते.या शिल्पांची रचना मांडणी अशा प्रकारे करण्यात आली आहे की पाहणाऱ्याला शिवकालीन इतिहासाची जणू जिवंत अनुभूती येते. विद्यार्थ्यांसाठी आणि इतिहासप्रेमी पर्यटकांसाठी डेरवण हे केवळ शैक्षणिक आणि प्रेरणादायी स्थान नाही, तर राष्ट्रभक्ती प्रेरणेचा उत्तम स्रोत आहे. हे स्थळ पाहून मन आनंदित झाले आणि डोळ्यांचे पारणे फिटले.डेरवण येथील गोशाळा पाहून बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. आजच्या यांत्रिक आणि आधुनिक युगात देशी गायींचं अस्तित्व कमी होत चाललं आहे, त्यामुळे त्यांचं संरक्षण संगोपन ही काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे. मंदिरातून दर्शन घेऊन परतताना अचानक वासराच्या हंबरण्याचा आवाज कानावर आला आणि क्षणात मन बालपणात हरवून गेलं. खूप वर्षांनंतर तो परिचित, गोड आवाज पुन्हा ऐकायला मिळाला, ज्याने मन भरून आलं.

या पिकनिकचे खास वैशिष्ट्य म्हणजे, सद्गुरू श्री वामनराव पै यांचे शिष्य श्री गोविंद चव्हाण यांच्यासारखी अध्यात्मिक अधिष्ठान असलेली व्यक्ती आमच्यासोबत होती. त्यामुळे प्रवासात अधूनमधून होणाऱ्या प्रार्थनांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आध्यात्मिकतेने भारलेले जाणवले.

दुसरे विशेष म्हणजे, गोविंद आजगेकर जेव्हा बोलायला उभे राहत, तेव्हा त्यांचे वक्तव्य एखाद्या अनुभवी हरिभक्त परायण प्रवचनकाराला सुद्धा मागे टाकणारे वाटायचे. त्यामुळे उपस्थित सर्वजण त्यांच्या बोलण्यात इतके रममाण होत की, एक मंत्रमुग्ध शांतता पसरायची आणि त्याचे मध्येच विनोदी बहारदार चुटकुले हास्याचा पाऊस पाडत. प्रकाश डोंगरे यानी गोविंदचे ज्या शब्दांत वर्णन केले ते एकदम बरोबर आहे. संपूर्ण पिकनिकच्या दोन  दिवसाच्या कालावधीत अर्धी बॅटिंग त्याने एकट्यानेच केली. एवढे मनोरंजन करणारी व्यक्ती आपल्या पिकनिक परिवारात पहिल्यांदाच आल्यामुळे त्याच्या अष्टपैलुत्वातल्या नवीन पैलूची ओळख झाली ही पिकनिक एकदम भारी झाली म्हणायला काहीच हरकत नाही.

या पिकनिकमध्ये श्री. नाफडे श्री. वेसावकर कुटुंबीयांचा विशेष सहभाग लाभला, ज्यामुळे आनंदात आणखी भर पडली. विशेषतः नाफडे कुटुंबीयांनी पिकनिकला खरी रंगत आणली. श्री. नाफडे यांनी मनमोकळ्या चर्चेत अनेक विषयांना स्पर्श केला, विशेषतः सायकोलॉजी आणि इतर ज्ञानवर्धक विषयांवरील त्यांचे विचार अत्यंत रोचक आणि माहितीपूर्ण होते, त्यामुळे सर्वांच्या सामान्य ज्ञानातही भर पडली. विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी आमचा प्रवास उत्साहवर्धक ठरला.

या पिकनिकचा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सहभागी सगळेजण सामाजिक बांधिलकी जपणारे आणि जीवनात तळागाळातून पुढे आलेले असल्यामुळे एकमेकांविषयी आत्मीयता आणि आदराची भावना ठळकपणे जाणवत होती. सगळे मिळून गप्पागोष्टीत रमले होते, त्यामुळे ही पिकनिक एखाद्या आपुलकीच्या स्नेहमेळाव्यासारखी वाटली.

कोकणच्या प्रवासात प्रत्येकाने आपल्या जीवनप्रवासाचा वेध घेत, आपण आज इथवर कसे पोहोचलो याची सुंदर शब्दांत मांडणी केली. त्यामुळे हा प्रवास नुसता सहल नसून, आप्तस्वकीयांच्या स्नेहबंधांचा एक उत्सव ठरला. अशा सहली सतत होत राहिल्या तर जीवन अधिक समृद्ध, आनंददायक होईल, याबाबत कुठलीही शंका नाही. विशेषतः महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि प्रत्येक ठिकाणी फोटो काढण्यासाठी लागलेली लगबग, हे दृश्य खासच होतं.एकूणच हा प्रवास इतका सुखकर आणि समाधानकारक ठरला की, सातत्याने प्रवास करूनही थकवा कधी जाणवला नाही.

आपल्या जीवनातील चढ-उतार, संघर्ष, आणि कष्टांच्या आठवणी सांगताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले ऐकणाऱ्यांच्याही डोळ्यांच्या कडा आपोआपच  ओल्या होऊन गेल्या. हा प्रवास चालू असताना आपल्या आयुष्याच्या प्रवासातील काही गमतीदार किस्से किंवा आपलं लग्न कसं ठरलं? अशा विषयावर बोलताना काहीजण भावूक झाले, तर काही जणांनी महाराष्ट्राची हास्ययात्रा सारखा विनोदी माहोल तयार केला आणि हास्यकल्लोळ उडाला. तातोबा आणि आबा यांचे लग्न ठरवताना 'बायको बघताच ठरवली'  हे किस्से, प्रकाश देवरकर याचा 'शिक्षण किती?' या प्रश्नावर दिलेलं प्रामाणिक उत्तर आणि प्रकाश डोंगरे पिक्चरला जाताना सायकलवरचा पाठीमागचा मित्र रात्रीच्या अंधारात  कधी पडला हे माहीत नसूनही बघितलेला पिक्चर असे  बऱ्याच जणांनी मनमोकळं करून त्यांच्या आयुष्यात घडलेले अपवादात्मक किस्से ऐकवून हसून हसून पोट दुखवले.

या पिकनिकच्या आयोजकांनी प्रत्येक ठिकाणी प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेतल्यामुळे, कमी खर्चातही ही पिकनिक अत्यंत यशस्वी ठरली. त्यांच्या या कौशल्याचं कितीही कौतुक केलं तरी ते थोडंच आहे. ही पिकनिक अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी होण्यामागे गोविंद चव्हाण, देवदास चव्हाण, प्रमोद कातकर, प्रकाश देवरकर, शिवाजी ढवळे, पांडुरंग डोंगरे, सुरेश शिंत्रे, तातोबा चव्हाण आणि बाळू लोहार आणि समस्त महिलांच्याकडून लाभलेले विशेष सहकार्य महत्त्वाचे ठरले हे विसरता येणार नाही. या पिकनिकला आलेल्या जवळ जवळ सगळ्यांच्या बद्दल सविस्तर लिहायचं ठरवलं तर एक गुण गौरव अंक तयार होईल, इतकं मी प्रत्येकाला जवळून ओळखतो. यामधील तरुण मंडळी आम्हा ज्येष्ठांची काळजी अगदी घरच्यांसारखी आणि इतक्या आपुलकीने घेत होती, हे पाहून मन अतिशय भारावून गेले आणि या पिकनिकमुळे एक वेगळीच ऊर्जा मिळाली. तसेच सहभागी झालेल्या बालकलाकारांमुळे या पिकनिकला इंद्रधनुष्यासारखी रंगीबेरंगी छटा मिळाली. या पिकनिकमध्ये ज्या बंधू भगिनींनी भाग घेतला त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद !

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ सद्गुरु श्री वामनराव पै यांनी दिलेला हा संदेश आपल्या जीवनाची दिशा, यश किंवा अपयश ही बाह्य परिस्थितीपेक्षा आपल्या निर्णयांवर, कर्तृत्वावर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते हे सांगतो. आपण स्वतःच आपल्या आयुष्याची घडण घडवू शकतो. जसं शिल्पकार दगडातून सुंदर मूर्ती घडवतो, तसंच आपणही आपल्या विचारांनी, कृतींनी आणि स्वप्नांनी आपलं आयुष्य घडवू शकतो. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या प्रार्थनेने या कौटुंबिक सहलीच्या वर्णनाचा समारोप करतो.

हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.’

Comments

Popular posts from this blog