श्रीमती नजहत शेख सी.एम.डी.
आज २०२६ या नववर्षाच्या शुभ अशा प्रारंभदिनी श्रीमती नजहत शेख यांनी आरसीएफच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD) पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणे ही आम्हा सर्व आजी-माजी कर्मचारी व अधिकारी वर्गासाठी अत्यंत आनंददायी व गौरवास्पद बाब आहे. विशेष म्हणजे श्रीमती शेख मॅडम या मुळत: वित्त विभागाच्या असल्यामुळे वित्त विभागासाठी ही नियुक्ती अधिक अभिमानास्पद आहे. या शुभप्रसंगी मी श्रीमती शेख मॅडम यांचा शब्द रुपी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत आहे.
श्रीमती शेख मॅडम या मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या पदवीधर असून त्यांनी लेखा विभागातील सर्वोच्च मानाची अशी चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी प्राप्त केली आहे. सदर पदवी प्राप्ती नंतर सन १९८९ मध्ये त्यांनी आर सी एफ मध्ये लेखा अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या सातत्यपूर्ण मेहनत, प्रामाणिकपणा, चिकाटी,दूरदृष्टी आणि प्रभावी नेतृत्वगुणांच्या जोरावर त्यांनी कंपनीच्या सर्वोच्च पदापर्यंत यशस्वी मजल मारली ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आहे.
श्रीमती शेख मॅडम यांचे वडील आर सी एफ मध्ये एक आदर्श स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या सेवाकाळात त्यांच्या सोबत काम केलेले अनेक सहकारी श्रीमती शेख मॅडमच्या बालपणापासून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीपर्यंत, आणि पुढे आर सी एफ मधील लेखा अधिकारी या पदापासून ते चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD)
या पदापर्यंत झालेल्या त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे साक्षीदार आहेत. त्यांचा जीवनप्रवास एकाद्या अत्युच्च पर्वताच्या पायथ्याशी सुरू होऊन तो पर्वतावर विराजमान असलेल्या मंदिराच्या शिखरावर यशस्वीपणे केलेल्या आरोहणासारखा आहे. हा स्वप्नवत प्रवास त्यांच्या अथक परिश्रमांमुळे, कामाविषयीच्या निष्ठेमुळे व योग्य वेळी ठाम निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे साकार झाला आहे. आर सी एफ मधील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सुकन्या म्हणून हा क्षण अधिकच भावनिक व गौरवपूर्ण ठरतो.
१९९१ साली सेंट्रल अकाउंट्स विभागात माझी बदली झाल्यानंतर श्रीमती शेख मॅडम यांच्यासोबत सुमारे तीन–चार वर्षे काम करण्याची संधी मला लाभली. त्या काळात आर सी एफ मधील एकूण कामकाजाची सखोल माहिती मला त्यांच्याकडून मिळाली आणि त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. त्यामुळे मी त्यांना नेहमीच गुरुस्थानी मानले आहे.
त्यानंतर २००६ साली आर सी एफ मध्ये SAP प्रणाली सुरू झाल्यानंतर SAP User Manual तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ९ सदस्यीय विशेष समितीत, श्रीमती शेख मॅडम यांच्या नेतृत्वाखाली मला ‘कोर टीम मेंबर फॉर एक्साईज’ म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. पुढे २००८ ते २०१४ ( सेवा निवृत्तीपर्यंत) मी आयपीडी/मार्केटिंग विभागात कार्यरत असताना SAP, प्रायसिंग प्रपोजल कन्करन्स किंवा फायनान्सशी संबंधित कामात त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले, हे मी माझे भाग्य समजतो.
मला मिळालेल्या प्रत्येक पदोन्नतीत आणि यशात त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि मदतीचा महत्त्वाचा वाटा आहे हे मी आवर्जून सांगू इच्छितो. माझ्या सेवाकाळात जे अनेक वरीष्ठ अधिकारी माझ्या संपर्कात आले त्यापैकी मला मार्गदर्शक ठरलेल्या काही मोजक्या अश्या वरिष्ठांमध्ये श्रीमती शेख मॅडम यांचे नाव मला अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
कर्तव्यनिष्ठा, दूरदृष्टी आणि शिस्त यांचा आदर्श ठेवत फायनान्स डायरेक्टर म्हणून श्रीमती शेख मॅडम यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी कंपनीच्या वाटचालीस सदैव मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली आहे.उत्तम नेतृत्व,आर्थिक शिस्त, पारदर्शक निर्णयप्रक्रिया, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि संघभावनेतून काम करण्याची त्यांची शैली यामुळे कंपनीच्या प्रगतीला भक्कम अधिष्ठान लाभले. आव्हानात्मक परिस्थितीतही संयम, अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि ठाम निर्णयक्षमता यांच्या जोरावर त्यांनी फायनान्स विभागाला कायम यशस्वी ठेवले ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.
श्रीमती श्री. शेख मॅडम यांना उर्वरित आयुष्यात निरोगी असे दीर्घायुष्य, अखंड प्रेरणा व उज्ज्वल यश लाभो व येणारे नूतन वर्ष त्यांना सुखाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
श्री बाळासाहेब शिंत्रे
(9820892699)
वरीष्ठ वित्त प्रबंधक (निवृत्त)
कमिटी सदस्य-आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम.
Comments
Post a Comment