सहजीवनाची सोबती-६० वा वाढदिवस

 23 जानेवारी 2026





प्रिय सौ. रंजना,

तुझ्या साठाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

आजच्या शुभदिनानिमित्त, तुझा पती या नात्याने तुला शुभेच्छा देताना मन अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून येत आहे. आपल्या लग्नापासून आतापर्यंतच्या जीवनप्रवासाकडे मागे वळून पाहताना, असंख्य चढउतार, संघर्ष, आनंद आणि अश्रूंनी भरलेले क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात. त्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांचा हात घट्ट धरून आपण पुढे चालत राहिलो. आज त्या साऱ्या आठवणींच्या साक्षीने, आपण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या अंकात पाऊल ठेवत आहोत—जिथे अनुभवांचं शहाणपण, समाधानाची शांतता आणि एकमेकांच्या सोबतीची खरी जाणीव अधिक खोल होत जाते.

आपल्या लग्नापूर्वी नुकतीच दहावी पास झालेली तू—संसार म्हणजे काय हेही नीट माहीत नसताना—डोंबिवलीच्या एका बैठ्या चाळीतील खोलीमध्ये आपला संसार चालू केला. ते दिवस आठवले की आजही मन हेलावून टाकते. तुटपुंज्या पगारात, अपार प्रेमाने आणि निष्ठेने तू आमच्या संसाराची एक सुंदर फुलबाग फुलवलीस.

शिंत्रे कुटुंब एकत्र ठेवत, प्रत्येक सदस्यावर जिवापाड प्रेम करत, आपली मुले—हर्षदा आणि मिलिंद—यांना घडवण्यात आणि त्यांना उच्चशिक्षित करण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे, हे मी मनापासून मान्य करतो. जीवनातील प्रत्येक चढउतारात तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिलीस; आणि त्याच बळावर आपण समाधान, स्थैर्य आणि समृद्धीची एक सन्माननीय उंची गाठू शकलो, असे मला प्रामाणिकपणे वाटते.

आपली मुलं शाळेत असताना त्यांचं प्राथमिक शिक्षण चालू असताना तुझं शिक्षण घेण्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी १९९१ मध्ये 'यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक' या विद्यापीठाच्या  'मॉडर्न कॉलेज' मध्ये आर्ट्स फॅकल्टीमध्ये ऍडमिशन घेतले. मी ऑफिसवरून घरी आलो की मुलं आणि तू आपआपल्या अभ्यासात मग्न असायचे. त्यावेळी आमच्याकडे नात्यातली चार-पाच मुले घरी वास्तव करत असल्यामुळे त्यांच्या जेवणा खाण्याची जबाबदारी पार पाडत तू पहिल्या  बॅचची पदवीधर होण्याचा मान तू पटकावला.

त्यानंतर लगेचच १९९५ साली नवी मुंबई महानगरपालिकेची प्रथम नगरसेविका म्हणून निवडून येण्याचं भाग्य तुला लाभलं आणि तो क्षण तुझ्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. जनतेच्या विश्वासावर निवडून येत, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत तू कामाला सुरुवात केलीस. पुढे शिक्षण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे या ठाम विश्वासातून आजरा तालुक्यात शिक्षण संस्था स्थापन करून एक हायस्कूल सुरू केलंस. ग्रामीण व वंचित भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून तू सामाजिक बांधिलकीचा एक आदर्शच घालून दिलास.

ही राजकीय वाटचाल करत असताना गेली पंधरा वर्षे 'नवी मुंबई जिल्हा संघटक' या पदावर कार्यरत असून असुन सुद्धा 'गृहिणी' हे पद सर्वश्रेष्ठ समजून
राजकारणाची चप्पल घराबाहेरच ठेवून संस्कारांची जपणूक करत, तू सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यातील मर्यादा अत्यंत शिस्तबद्धपणे पाळत आलीस. त्यामुळे आमची मुलं ही सुसंस्कारित झाली, उच्चशिक्षित झाली, याचा मला सार्थ अभिमान आहे. राजकारणात उंची गाठताना तू कधीच माणुसकी सोडली नाहीस. सत्तेपेक्षा सेवा मोठी असते, हे तुझ्या प्रत्येक निर्णयातून आणि कृतीतून दिसून येतं. म्हणूनच आज हजारो लोकांच्या मनात तू ‘नेतृत्त्व’ म्हणून नाही, तर ‘आपल्या हक्काची मॅडम किंवा ताई’ म्हणून स्थान मिळवलंस—हेच तुझं सर्वात मोठं यश आहे.

आपल्या लग्नानंतरचा ४४ वर्षांचा हा प्रवास केवळ पदांचा मर्यादित आलेख नसून, त्याग, कष्ट, कर्तृत्व आणि जनतेने दिलेल्या विश्वासातून घडलेला एक खऱ्या अर्थाने दैदीप्यमान प्रवास ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून, कोणताही मोह, अडथळा किंवा दबाव न जुमानता तू जनसेवेची वाट अखंडपणे चालत राहिलीस.

स्त्री म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून आणि कर्तृत्ववान नेत्या म्हणून तुझा प्रत्येक दिवस प्रेरणादायी ठरला आहे. तुझ्या संघर्षातून अनेक मुलींना स्वप्न पाहण्याचं बळ मिळालं, तर असंख्य महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास मिळाला. तुझे विचार, कार्यशैली आणि समाजाप्रती असलेली निष्ठा हीच तुझी खरी ओळख आहे.

घर, कुटुंब आणि समाज—या तिन्ही आघाड्यांवर तू अपार ताकदीने उभी राहिलीस. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत, जनतेच्या दुःखात स्वतःला सामावून घेत, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणं सहज शक्य नसतं; पण तू ते करून दाखवलंस. नवी मुंबईच्या राजकीय क्षेत्रात तुझ्यामुळे ‘शिंत्रे’ या आडनावाला मिळालेलं वेगळं वलय ही शिंत्रे घराण्याची अभिमानाची गोष्ट आहे.

हा साठावा वाढदिवस केवळ एक तारीख नाही, तर तुझ्या त्यागाने, कष्टाने आणि न थकणाऱ्या संघर्षाने उजळलेला सुवर्णक्षण आहे. तुझ्यासोबत चालताना मिळालेला आधार, विश्वास आणि प्रेम—यासाठी मनात शब्दात न मावणारी कृतज्ञता आहे. तू आहेस, म्हणूनच हे सगळं शक्य झालं.

या वाढदिवसानिमित्त एवढीच प्रार्थना—तुझं आरोग्य सदैव उत्तम राहो, चेहऱ्यावरचं हास्य कायम राहो आणि तुझी सेवा, माया व नेतृत्व अजून अनेक वर्षे समाजाला लाभो. ईश्वर तुला दीर्घायुष्य, ऊर्जा आणि बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

पुन्हा एकदा साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा जीवन साथी,
बाळासाहेब शिंत्रे

Comments

Popular posts from this blog

ग्रामस्थ मंडळ व पतसंस्था वार्षिक सभा

🎶 हेमंतकुमार - अविस्मरणीय मैफल! 🎶

गणपतीपुळे पिकनिक : एक स्नेह संमेलन