माझ्या लेकीचा वाढदिवस
24 फेब्रुवारी 2026
आज माझ्या मुलीचा—हर्षदाचा—वाढदिवस!
या शुभदिनी ‘पहिली बेटी धनाची पेटी’ या उक्तीचा खरा अर्थ आम्ही शब्दांत नाही, तर अनुभवांतून जगलो. तिच्या जन्मानंतर अवघ्या काही महिन्यांतच वाशीच्या घराची चावी आमच्या हातात आली आणि त्या क्षणापासून आमच्या आयुष्यात प्रगती, स्थैर्य आणि समाधानाचं दालन सातत्याने उघडत गेलं—या एका ओळीत सगळं सामावलेलं आहे.तिचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला; पण तिला सासरी पाठवताना बिदाईच्या त्या क्षणी आमचं पंचवीस जणांचं संपूर्ण कुटुंब धाय मोकलून रडलं. त्या वेळी माझा तर स्वतःवरचा ताबा राहिला नव्हता. त्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगाचे साक्षीदार असलेल्या नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना तिचं आमच्या आयुष्यातील स्थान किती अमूल्य आहे, याची जाणीव नक्कीच झाली असेल.
या माझ्या ‘धनाच्या पेटी’ला—हर्षदाला (पिंकूला)—वाढदिवसाच्या मनःपूर्वक, खूप खूप शुभेच्छा! 💐💐🎂🎂
आज एक खास गोष्ट सांगावीशी वाटते. मुलींविषयी अनेक म्हणी, सुविचार प्रचलित आहेत; पण न्यू कृष्णा टॉवरच्या गेटजवळ लिहिलेला एक सुविचार मनाला कायम स्पर्शून जातो—
‘जर मुलगा असेल वारस, तर मुलगी आहे पारस!’
तो वाचला की वाटतं, विधात्याने प्रत्येकाच्या पदरात किमान एक तरी मुलगी नक्कीच टाकावी.
आमची दोन्ही मुले—हर्षदा आणि मिलिंद—आज परदेशात असली, तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सतत आमच्याशी जोडलेली असतात. त्यामुळे ती शरीराने दूर असली, तरी मनाने मात्र कायम आमच्याच सोबत आहेत—हेच यातून सिद्ध होतं. याच नात्यांच्या ऊबेमुळे मी आणि माझी पत्नी सौ. रंजन आज अत्यंत सुखी, समाधानी आणि कृतज्ञ आहोत.
वाढदिवसाच्या या मंगलदिनी हर्षदाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्य लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🙏🙏
तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस समाधान, सकारात्मकता आणि यशाने उजळत राहो.
ती सदैव निरोगी, सुखी आणि हसतमुख राहो—हीच आई-वडिलांची हृदयापासून दिलेली शुभेच्छा. 💐🎂
Comments
Post a Comment