वेबसाईटबद्दल आलेल्या प्रतिक्रिया

 १) श्री. वसंत शिंत्रे

पोलीस उपनिरीक्षक (निवृत्त) व चुलत भाऊ

आदरणीय बाळासाहेब शिंत्रे साहेब,
       आपणा बद्दल काय लिहायचं आणि  कोठून सुरुवात करायची हेच समजून येत नाही.
        वैयक्तिक सांगायचे म्हणजे आपण आपल्या शिंत्रे कुटुंबाचा तुम्ही शिरोमणी आहात. शिंत्रे कुटुंबाची शान आहात. शिंत्रे कुटुंबातील सुशिक्षित मध्ये आपण पहिलेच आहात. आमच्यासारख्या नवतरुण मुलांना मुंबईमध्ये सहारा दिला ,नोकरी दिली . योग्य दिशा दाखवली आमच्यासारख्या दगडातून वेडी वाकडी का असेना पण मूर्ती तयार केली. खरोखर धन्यवाद साहेब. आज देखील आम्ही  तुमच्या समोर नतमस्तक होत असतो. तुम्ही आमचे आदर्श आहात . अजून एक आदर्श महाराष्ट्र पोलीस कबड्डी संघाचे कॅप्टन म्हणून शामराव कातकर साहेबांचे देखील नाव डोळ्यासमोर नेहमी येत असते. तसे पाहिले तर गावातील सर्व वडीलधाऱ्या  माणसांचा आम्ही मनापासून  मान सन्मान राखत असतो.
        सध्याचा आपला आयुष्याचा प्रवास म्हणजे मराठी पिक्चर  "72  मैल एक प्रवास " त्या प्रमाणे आपला प्रवास 72 मैल क्रॉस करून अमृत महोत्सव तसेच सेंचुरी कडे चालू आहे आणि तो आपण पूर्ण करावा अशी आमची मनापासून इच्छा असून देवाकडे हीच एक मागणी आहे की त्यांना दीर्घायुष्य मिळू दे..
         तुमच्या जीवनाचा  खडतर प्रवास तुम्ही आपल्या "जीवन तरंग" या पस्तकातून प्रसारित केलेला आहे. त्यामध्ये आपण गावाबद्दल असलेली तळमळ, गावच्या लोकांसाठी काहीतरी करावे त्यांना एकत्र आणावे ही आपली इच्छा होती. गावचे मंडळ, पतपेढी रजिस्टर करणे यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. सिंहाचा वाटा म्हणण्यापेक्षा ते काम आपणच केलेले आहे. आजच्या नवतरुण मुलांच काय सांगता येत नाही परंतु आमच्या वेळेचे जी मुले होती ती सर्व आपल्याला मानतात. कारण आम्हाला तुमचा खडतर प्रवास माहित आहे. आज तुम्ही आमच्या गावचे आधारस्तंभ आहात, केंद्रबिंदू आहात. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुमच्या अवतीभवती फिरत असतो. गावची पिकनिक काढायची असेल तर तुम्ही अग्रेसर असता. लोकांना एकत्रित कसे करायचे याकरिता पिकनिक किंवा गेट-टुगेदर चे महत्व काय असते त्यातून एक नवीन उपक्रम राबवता आणि त्याचे महत्त्व आम्हाला समजावून सांगता.

       तुमच्या हायस्कूल तसेच कॉलेज जीवनात तुमचे चार मित्र होते त्यांचे तुम्ही केंद्रबिंदू होता. आज देखील ते तुमचेच गायडन्स घेतात यावरून आपल्या बुद्धिमत्तेचा विचार करावा तेवढा कमीच आहे. तुमचा तो कॉलेजचा बिटल्स कट फोटो देखील फार आवडला, उलट आम्ही गडहिंग्लज येथे कॉलेजला असते वेळी आमचे रुम पार्टनर म्हणून कोल्हापूरचे एक प्राध्यापक विजय सकटे राहात होते. ते कॉलेजला जात असते वेळी आम्हाला चहा नाश्ता द्यायचे. परंतु कॉलेजमधून आल्यानंतर आमचा शिजवत असलेला अर्धा कच्चा न शिजलेला भात खायचे त्यामुळे आम्हाला पुन्हा भात करावा लागायचा. मग एक दिवस त्यांच्या खानावळीत जेवायला  त्यांच्या बरोबर गेलो.तेव्हा त्यांची खानावळीवाली आम्ही खात असलेले बघून त्यांना म्हणायची चार गाढवे परवडली पण यांना परत घेऊन येऊ नका एवढे आम्ही खादाड होतो. कॉलेजचे दिवस होते. मजाक मस्ती भरपूर चालायची .
             अजूनही आपल्याला एक सांगावसे वाटते की, आपण एकदा म्हणाला होता.जसे गावातील तुरटे , डोंगरे समाज एकत्र येतात त्याप्रमाणे आपले शिंत्रे कुटुंब देखील एकत्र यावेत , मला थोडी उणीव वाटते याकरिता कोणताही गेट-टुगेदर सारखा कार्यक्रम करावा. एकत्रित आल्याने कार्यक्रमाला शोभा येते, मनातील राग , द्वेष कमी होतो. याकरिता एकत्र येणे फार महत्त्वाचे आहे. याकरिता आपण पुढे होऊन मार्गदर्शन करावे आम्ही सोबत आहोतच हे फार महत्वाचे आहे.
       सामाजिक कार्यासाठी  न थांबता दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून तुमच्या सामाजिक कारकर्दीला 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. हाफ सेंचुरी मारली आहे. सेंचुरी लवकरच पूर्ण होऊ द्या. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
            लिहिण्यामध्ये काही थोडेफार चुकले असेल तर माफ करावे .धन्यवाद.

आपला
वसंत शिंत्रे

२) श्री. निलेश र्‍हाटवळ 
नवोदित लेखक आणि ग्रामस्थ

सस्नेह नमस्कार...🙏

गरीबी, संघर्षाच्या परिस्थितीत खंबीरपणे तोंड देत अंधारलेला काळोख चिमणीच्या साह्याने दूर सारून सुखाच्या चांदण्यांची पेरणी करताना परिस्थितीचे जू खांद्यावर घेऊन, आई/वडील बंधू यांच्या साह्याने जिद्दीच्या जोरावर मंजिलं पर्यंत पोहोचणं म्हणजेच "जीवन तरंग, हे पुस्तक. आयुष्य आणि गरीबी चा संघर्ष, डोळ्यासमोर उभ ठाकत आपल्यातीलच लोकांच्याकडून झालेला त्रास, अवहेलना वाचून अंतःकरण गहिवरून येतं. पण त्याच गरीबीमुळे उपजत शहाण पण येतं गेलं.
जन्मापासूनचा संघर्ष शिकण्याचे लढण्याचे सामर्थ्य ह्या सर्वांचे परिस्थितीनेच बाळकडू पाजलं. गरिबीतले शिक्षण पुढे नोकरी, हे सर्वच मनाला अस्वस्थ करुन गेल.
तुम्हा भावंडांचं संगोपन करताना आई/ बाबू काका यांची जीवनाची झुंज वाचून नकळत अश्रू आवरणे कठीण झाले. त्या जुन्या काळी त्या परिस्थितीत देखील काकांचे वर्तणूक आणि भावंडांच्या साठी ची तडफड पाहून मनात चैतन्याचा जिव्हाळा वाटला.
त्यांचा सर्व संघर्ष हा तुमच्या कुटुंबासाठी लढण्यात गेला. सण, यात्रेतील खेळणी म्हणून ट्रक, ट्रॅक्टर, किंबहुना गाडी घेता आली नाही. खेळण्यांच्या कडे बघूनच समाधान मानावे लागायचे वाचताना याचे शल्य वाटत राहिले. अगणित कष्ट उपसून, वेळप्रसंगी उपाशीपोटी राहून भावंडांना मोठे केले. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि लेकरांसाठी गरीबीशी लढण्याचे आत्मबळ परिस्थिती देत गेली.
परिस्थिती कितीही बिकट असो परंतु तिलाही जिद्दीपुढे हार मानावीच लागते. हे तुमच्या स्वभावाने दाखवून दिलं. परिस्थितीने झुंजवलं पण तुम्ही हार मानली नाही. हे तुम्ही सिद्ध करून दाखवला आणि आम्हा पेद्रेवाडी करांच्यासाठी एक उदाहरण बनवून राहिलात
म्हणूनच आज रिटायरमेंट नंतर, लेखक, Accountant, मॅनेजर शिवसेनेचे नेते, होऊन नावारुपाला आलात. याचे सर्व श्रेय आई आणि बंधू राजे यांना जाते. एकंदर परिस्थिती आणि गरीबीचा बाऊ न करता नियतीशी लढा देऊन खंबीरपणे शालेय जीवन जिंकून दाखवले. आणि म्हणून प्रत्येक पेद्रेवाडी करानि वाचाव असं हे "जीवन तरंग, हे पुस्तक...
गावाचे सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण बोलीभाषा यांचा वापर भौगोलिक संदर्भ व वर्णन वाचून प्रसंग उभे करण्याचे लेखन कौशल्य संवेदनशील आहे. शालेय जीवनातील मित्र बालमित्रांची मैत्री ही निखळ वाहत्या झऱ्यासारखी जागोजागी प्रवाहीत करते. आता इतकंच.!! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..🙏💐

शुभेच्छुक
निलेश र्‍हाटवळ 

३) श्री. अशोक देवकुळे
जेष्ठ गायक कलाकार व कॉलेजचा मित्र

" दिव्यत्वाची जेथे प्रचिती "
" तेथे कर माझे जुळती "
हा, बाळासाहेब तुमचा १५ ऑगस्ट २०२६ रोजी W WW Balasaheb Shintre Com ह्या संकेतस्थळावर तुम्ही सर्वांसाठी ज्या सुंदर मांडणी करीत तुमच्या सर्व कालीन आठवणी, सामाजिक कार्य, जीवन तरंग ह्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा, विशेष: पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे उल्लेकनीय प्रेरणा देणारे पत्र वाचून खरंच मनापासून आनंद झाला. आपला एक वसतीगृहातील विद्यार्थी आपल्या सम कालीन कामगिरीने यशाचे उंच उंच शिखरे गाठत आज ७२ व्या वर्षी देखील तरूणाईला लाजवेल अशी कारकीर्द तुम्ही समाजामध्ये ( एवरेस्ट शिखराला वाकावे लागावी ) पाय खंडा घालून देण्याची जी किमया केली आहे त्यास त्रिवार
दंडवत
दंडवत
दंडवत
तुमची लेखनी ही ग्रामीण भाषेची नुसती नाळ नसून तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेले किस्से अगदी जीवंत करून लोकांन समोर मांडण्यात तुमचा हातखंडा किती आहे हे प्रकर्षाने जाणवीले म्हणूनचं मला मराठी साहित्यातील नामवंत,किर्तीवंत असणाऱ्या लेखकांची प्रर्कषाने आठवण होणार नाही तर नवल कसले त्या मध्ये अण्णा भाऊ साठे, शंकर पाटील,द.मा. मिरासदार इ. प्रभुतींच्या पंगतीत बसण्याचे भाग्य तुम्हाला लाभले आहे असे माझे वैयक्तिक मनोगत अगदी अंतकरणापासुन व्यक्त करताना मला आकाशही ठेंगणे वाटू लागले आहे.
बाळासाहेब, तुम्हाला अन् संपूर्ण परिवाराला उत्तम आरोग्य लाभो,तुमची लेखनी भविष्य काळातही तळपत राहो ही मी मनोभावे ३३ कोटी देव देवीकांना प्रार्थना करतो

तुमचाच मित्र,
अशोक देवकुळे
दि. १९/८/२०२६


४) सौ. माया म्हैसणे,
अकोला, जिल्हा संघटक

साहेब, तुमचे जीवन तरंग हे पुस्तक मी वाचले .ते पुस्तक वाचत असताना जणू काही ते सगळं आपल्या जीवनामध्ये घडत आहे असं वाटत होतं. त्या पुस्तकातील लेखन हे वास्तव चित्रणावर आधारित असल्यामुळे अगदी आपल्या मनातील भावना त्यामध्ये व्यक्त झालेल्या वाटत होत्या. भाषाशैली, लिखाण ,अलंकार अतिशय उत्कृष्ट आहेत. यामुळे आम्हाला आपल्या मधील एक उत्कृष्ट लेखक वाचायला मिळाला...
पुस्तकातील भाषा उगवती असून अगदी सोप्या सरळ शब्दांमध्ये मांडणी केलेली असल्यामुळे माझ्या 83 वर्षाच्या सासूबाईंना सुद्धा ते पुस्तक खूप आवडले..
आपल्याला पुढील आयुष्य करता खूप खूप शुभेच्छा साहेब..

शुभेच्छुक
सौ. माया म्हैसणे, 

५) श्री दिलीप ढवळे
मेव्हणा व ग्रामस्थ
आपल्या नवीन वेबसाईट अतिशय उत्तम आहे. आपण प्रतिकूल परिस्थिती तुन आपलं जीवन व सामाजिक बांधिलकी सांभाळून नवीन पिढीला जीवनाचा प्रवास सांगून त्यांच्या जीवनाला मार्ग दाखवणारे खरे मार्गदर्शक आहात 🌹🌹❤️❤️👍👍
शुभेच्छुक
दिलीप ढवळे

६) श्री शंकर कातकर
सीनियर सेक्शन इंजिनियर, सेंट्रल रेल्वे.
बालमित्र आणि ग्रामस्थ
सन्माननीय, बाळून्या. खरंच तू एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आहेस. मायेच्या, प्रेमाच्या, पारंब्यांनी बहरलेला एक वटवृक्ष आहेस. एक दिवस मेसेज आला आणि तुझ्या जीवन तरंग पुस्तकाबद्दल पाहिलं, ऐकलं आणि तुझ्या निगर्वी व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा नयनपटलावर रेखू लागली.

पेद्रेवाडी गावच्या रेताड मातीत रुजलेल्या काजू, आंबा फणस, या रसदार फळांच्या अमिट गोडीने भरलेल्या प्रत्येकाला आपलंसं करणाऱ्या प्रेमळ माणसांची आठवणी तुझ्या "जिवन तरंग" या पुस्तकामुळे जाग्या झाल्या, कारण माझ्या नोकरीचे तब्बल एक तप मी तुझ्या आणि माझ्या मैत्रीत व्यतीत केलं. तू जीवन तरंग, हे पुस्तक लिहिसील असं कधी वाटलं नव्हतं. मातीने घडवलेला, दुरदेशी असूनही मातीच्या माणसांवर नितांत प्रेम करणाऱ्या एका अवलीयाशी नकळत स्नेहाची नाळ जुळून आली. इतकं तुझ्यातील लेखन कौशल्य पाहून बाळून्या माझी देखील छाती गर्वाने भरून आली.

तुझ्या कर्तुत्वाचा अभिमान आम्हाला नक्कीच आहे. पण तुझ्यावर संस्कार करणाऱ्या तुझे मोठे भाऊ बाबू आणि आई, यांचा हेवा देखील वाटतो, कारण लहानपणापासूनच तुझ्यावर झालेले त्यांचे संस्कार हेच तुझ्या आजच्या यशाला कारणीभूत आहेत. त्यांच्या सदिच्छा & आशीर्वादाने तुझ्या लेखणीला कदाचित कलाटणी मिळाली. त्यामुळे कर्तुत्वाची, समाजकार्याची झेप घेण्याची क्षमता अजून वाढत गेली आणि इतकं प्रेम कमी की काय आणि तू संपूर्ण मित्र परिवाराला "जीवन तरंग, हे पुस्तक, भेट दिली.

तुझ्या लेखणीने तुझे जीवन अजून दमदार होईल, यात शंकाच नाही. माझी बायको म्हणते, "तुम्हाला नेहमी चांगली माणसं भेटतात." पण त्यातही तिचा वाटा किती आहे हे नव्याने सांगायला नको.आदरणीय "बाळूण्या, तुझ्या अच्युत प्रेमातून उतराई होणं कदापि शक्य नाही. त्यातल्या ऋणातच राहणे मला जास्त आवडेल. तुला उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि "जिवन तरंगच्या, दुसऱ्या आवृत्तीचे लवकरच प्रकाशन होवो, अशा माझ्याकडून सदिच्छा..!! तुमच्या सर्वांच्या जीवनात स्नेहाचा वसंत नेहमी बहरत राहो ही सदिच्छा.

शुभेच्छुक,
शंकर कातकर, & परिवार,
सीनियर इंजिनियर, सेंट्रल रेल्वे

७) मीना राव
आरसीएफ, मैत्रीण

मी वेबसाईट पुर्ण नाही वाचली, पण वेळ मिळाला की वाचेन.
मुखपृष्ठा वर असलेल्या जीवन प्रवास मध्ये देवादास चव्हाण यांनी तुझ्या बद्दल दिलेल्या 50 वर्षाच्या समाज सेवेचे विवरण तुझे मन आणि तुझ्या स्वभावा ऐवढंच अतिसुंदर आहे.
तुझे कॉलेज जीवन किती खडतर होते हे वाचून मन हेलावले आणि डोळे pan ओलावले.
त्या खडतर जीवनाला मात देऊन तू आपल्या आयुष्यात उभारून यार भव्य जाग्यावर उभा आहेस.
या मागे तुझे अफाट परिश्रम, जिद्द, सेवाभाव आणि मन मिळावू स्वभाव आणि त्यात तशीच मनमिळाऊ सेवाभावी धर्म पत्नी सौ रंजना ची साथ.
मी सर्व काही वाचू शकले नाही पण तुझे जीवन तरंग पुस्तकं मी पूर्वीच वाचले आहे.
तिथे तर तू मला आपल्या आणि माझ्या बालपण मध्ये देऊन गेलास.
तुझी शब्द शैली आणि प्रसंगाची आत्मीयता जीवन तरंग वाचताना मन कसं भारावून जाते.
असा हा भला माणूस शित्रे माझा मित्र आहे आणि मला त्या बद्दल आणि त्याच्या बद्दल पण खूप अभिमान आहे.

शुभेच्छुक,
मीना राव

८) श्री. सुरेश घाडगे
महाप्रबंधक, आरसीएफ (निवृत्त)

🪴प्रिय बाळासाहेब तुमचं मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
स्मृतींचे इंद्रधनुष्य सर्व फोटो पाहिले , सुंदर संकलन .
एकंदरीत वेबसाईट चाळण्यासाठी खूप सोईची आणि आकर्षक आहे . बनविणाऱ्यास धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन. तुमची वेबसाईट पूर्णपणे पाहून, वाचून झाली . तुमच्या कार्याची / कामांची जंत्री पाहून आनंद वाटला . सर्व वाचकांच्या जीवन तरंग पुस्तकाबाबतच्या दिलखुलास , कौतूकास्पद प्रतिक्रिया वाचून झाल्या , व्हिडीओ / फोटो पाहिले . परत परत पहावी अशी वेबसाईट आहे , तुम्हालाही ही वेबसाईट परत परत पाहून आणखी काही उत्कृष्ट लिखाणाची प्रेरणा देईल याची खात्री देईल . तुमचं विविध साहित्यावरील वाचन / तुमचा जनसंपर्क तुम्हाला उपयोगी पडला असं वाटते .
माझ्याकडून काही प्रामाणिक सुचना .
1. लेखन चालू ठेवावे.
2. वेबसाईट अपडेट करीत रहावे .
3. जीवनतरंग पुस्तकाबाबत जाहिरात करावी , फ्लिपकार्ट/ अमेझान ची लिंक द्यावी जेणे करून नवीन वाचकास हे पुस्तक उपलब्ध होईल .
4. काही जवळच्या व्यक्तींबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायचे विसरलात असं वाटते . उदा . कै. सदाशिव कोळी साहेब , कै. खत्री साहेब , अजुनही काही जण राहिले असतील ?
सध्यातरी एवढचं! 😊🙏🏻👍

शुभेच्छुक
सुरेश घाडगे

९) श्री शितल देवरकर
आदर्श शिक्षक आणि ग्रामस्थ

साहेब, आपल्या वेबसाईटला भेट दिली. खूप छान आणि सुंदर डिझाइन केली आहे. पण त्याही पेक्षा आपला जीवनप्रवास, आपण संघर्ष करून मिळवलेले यश हे खूप प्रेरणादायी आहे. आमच्यासाठी आणि आपल्या गावातील तरुण पिढीसाठी आपले मार्गदर्शन हे खूप मौल्यवान आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻

शुभेच्छुक,
शितल देवरकर

१०) श्री प्रमोद शामराव कातकर व
सौ विद्या प्रमोद कातकर
निकटवर्तीय ग्रामस्थ

मा. श्री शिंत्रे साहेब,
प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन! 💐

आपली वेबसाईट पाहिली आणि खरोखरच मनापासून आनंद झाला. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला प्रवास, शिक्षण, नोकरी, कुटुंब, सामाजिक कार्य, संघटनात्मक जबाबदाऱ्या, संघर्ष आणि समाजासाठी केलेले विविध उपक्रम — हा संपूर्ण जीवनप्रवास अत्यंत सुंदर पद्धतीने मांडला आहे.

आपण आपुलकीने दिलेले ‘जीवन तरंग’ हे आत्मचरित्र मी वाचले आहे. आपल्या आयुष्याचा प्रवास वाचताना अनेक अनुभव मनाला भिडले. विशेषतः **‘जीवन तरंग’**च्या माध्यमातून आपण केवळ आपल्या आठवणी जतन केल्या नाहीत, तर पुढच्या पिढीला अनुभव, संघर्ष आणि मूल्यांची एक समृद्ध शिदोरी दिली आहे. “पैशांचा हिशोब केला, आता आठवणींचा हिशोब जुळवला” ही संकल्पनाच मनाला भावते.

तसेच आपल्या बरोबर केलेली कोकण दर्शनाची सहलही कायम स्मरणात राहील. त्या सहलीतील सुंदर आठवणी आणि क्षणचित्रे वेबसाईटवर पाहून पुन्हा एकदा त्या आनंददायी क्षणांना उजाळा मिळाला आणि खूप आनंद झाला. 😊

५१ वर्षांचा सामाजिक प्रवास आणि त्यामागची माणसं, नाती, अनुभव व आठवणी डिजिटल माध्यमातून जतन करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. खास करून पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि पतसंस्थेचे मागील 30 वर्षा पासून आपले अविरत योगदान उल्लेखनीय आहे. आपल्या या प्रदीर्घ कार्यास आमच्याकडून सलाम!!

आपल्या आयुष्याचा हा प्रेरणादायी प्रवास अनेकांना प्रेरणा देत राहो आणि आपली पुढील वाटचालही अशीच समाजाभिमुख, यशस्वी आणि आनंदमय राहो, ही मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹

वेबसाईटसाठी आणि ‘जीवन तरंग’साठी मनःपूर्वक अभिनंदन!

आपले आशीर्वाद आणि स्नेह सदैव सोबत असू द्या, हीच मनापासून इच्छा. 🙏

आपलेच,
श्री प्रमोद शामराव कातकर
सौ विद्या प्रमोद कातकर


११) श्री. डी.एन. दिवेकर
RCF Evergreen group Picnic फोटो पाहून कॉमेंट्स..

आपल्या सर्वांच्या केंद्रस्थानी आणि त्यांच्या सामाजिक कार्याच्या क्षेत्रात सदैव आपले लोकप्रिय व लाडके मित्र श्री बाळासाहेब शिंत्रे राहोत आणि त्यांचे बळ, प्रेम आणि भक्कम आधार आपल्या सर्वांना कायम लाभो हीच सदिच्छा. नितळ पाण्याप्रमाणे मन आणि निसर्गा सारखी सुंदर हिरवळ असलेल्या स्वभावाची महानुभूती आपल्या सोबत असणे ही एक परम भाग्याची गोष्ट आहे. आपणा सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. 🙏🌹😊

१२) 
श्री. अशोक देवकुळे
जेष्ठ गायक कलाकार व कॉलेजचा मित्र

बाळासाहेब, तुम्ही अन् मी आपण समवयस्क वस्तीगृहातील मित्र आहोत यांचा मला सार्थ अभिमान वाटतो कारण सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला हिंदू हृदय सम्राट मा.बाळासाहेबाच्या आशिर्वादाने तुम्ही जी गरूड झेप घेतलेली आहेत त्यास तोड नाही तुमचे व्यक्तिमत्व म्हणुनच समाजामध्ये वर्षानुसार खुललेले आहेत त्यास माझा मानाचा मुजरा.तुमच्या संकेतस्थळावर जे विविध प्रकारचे विवरण तुम्ही सादर केलेले आहे ते वाचून एका ग्रामीणखेड्यातल्या व्यक्ती ने जी उत्तुंग कामगिरी केली आहे ती भावी पिढीला निश्र्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे अन् तुमच्या सर्व कुटुंबियांनी तुम्हाला जी मोलाची साथ दिलेली आहे ती अतिशय उल्लेखनीय ठरलेली आहे आज अन् पुढील तुमच्या भावी जीवनात तुम्हाला तुमची हाक्काची शिदोरी ठरणार आहे.वा, बाळासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

तुमचाच हक्काचा जिवलग मित्र 
अशोक देवकुळे 
(जेष्ठ गायक कलाकार)
दि.१/१०/२०२६

















































Comments

Popular posts from this blog

ग्रामस्थ मंडळ व पतसंस्था वार्षिक सभा

🎶 हेमंतकुमार - अविस्मरणीय मैफल! 🎶

गणपतीपुळे पिकनिक : एक स्नेह संमेलन