मैत्रीचा अतूट बंध

मैत्रीचा अतूट बंध
माझ्या आयुष्यात अशी काही व्यक्तिमत्त्वे येऊन गेली की आजही त्यांची आठवण झाली की डोळे पाणावतात. आरसीएफमधील कोळी साहेब, न्यू कृष्णा टॉवरमधील तोमर साहेब, माझी मावशी तानुबाई, माझ्या सासूबाई शांताबाई आणि शिवसेनेतील मनोहर गायखे साहेब या व्यक्तींना मी कधीच विसरू शकत नाही. काही व्यक्तींबाबत तर मला मनापासून असे वाटते की, कदाचित त्यांचे आणि माझे पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असावेत. माझ्या आयुष्याच्या वाटेवर अनेक मित्र भेटले, पण मैत्रीण म्हणून सांगण्यासारखी एकच व्यक्ती ती म्हणजे पन्नास वर्षांपासूनची जिवलग मैत्रीण मीना राव.

आज अचानक अमेझॉनचे एक पार्सल घरी आले. ते माझा नातू रिधानच्या नावाने होते. त्याच्या नावाने आलेले ते पहिलेच पार्सल असावं. ते उघडल्यावर त्यामध्ये मीनाने रिधानसाठी एक सुंदर खेळ पाठवला होता. तो खेळ पाहताच रिधान आनंदाने अक्षरशः उड्या मारू लागला. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागस आनंद शब्दांत व्यक्त करणे अशक्य! फक्त मी ते भाव वाचू शकलो.त्या छोट्याशा भेटीने माझे मन पन्नास वर्षे मागे गेले आणि आमच्या मैत्रीचा संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला.

सन १९७६ मध्ये मी एक्स्ट्रा टेम्पररी कर्मचारी म्हणून एफसीआयमध्ये रुजू झालो. माझी नेमणूक एक्स्पान्शन अकाउंट्स सेक्शनमध्ये झाली. एका खेडेगावातून आलेला, लेबर स्कीममधून शिक्षण पूर्ण केलेला आणि मोठ्या कंपनीच्या वातावरणामुळे मनात दडपण असलेला मी, पहिल्याच दिवशी जाऊन मीना नाईकच्या शेजारच्या खुर्चीवर बसलो. अशा कार्यालयीन वातावरणाचा मला कोणताही अनुभव नव्हता. पहिला अर्धा दिवस ओळखपाळख, विचारपूस आणि मानसिक तणावातच गेला.

माझ्या एका बाजूला मीना आणि दुसऱ्या बाजूला श्रीमती तिलवानी होत्या. शिक्षणाच्या काळात मुलींशी कधी संवाद साधण्याची वेळच आली नव्हती, त्यामुळे मी अधिकच संकोचलेला होतो. माझी ही अवस्था मीनाने क्षणात ओळखली. ती हसून म्हणाली, "अरे शिंत्रे, एवढा का लाजतोस? बिनधास्त राहा." त्या एका वाक्याने माझ्या मनावरील दडपण बरेच हलके झाले. तिने मला काम समजावून सांगितले, कार्यालयातील पद्धती समजावल्या आणि इतक्या आत्मीयतेने मार्गदर्शन केले की ती मला मोठ्या बहिणीसारखी वाटू लागली.
दुसऱ्या दिवशी राजेंद्र जोशी रुजू झाला आणि काही दिवसांनी सुरेश ढाकेही आमच्या सेक्शनमध्ये आला. आमचा छोटासा ग्रुप तयार झाला. सेक्शनचा हॉल आयताकृती आणि आसन व्यवस्था आमने सामने होती. मीनाचे टेबल हॉलच्या मध्यभागी होते. लंचच्या वेळी गप्पा, विनोद आणि कामावरील चर्चा यामुळे कार्यालयातील वातावरण नेहमीच उत्साही असे. त्या वातावरणाचा केंद्रबिंदू मात्र मीनाच होती. ती एखादा प्रसंग सांगायला लागली की संपूर्ण सेक्शन तिच्याकडे लक्ष देऊन ऐकत असे. जोशीच्या मिश्किल टिप्पण्यांमुळे हास्यकल्लोळ उसळायचा आणि कार्यालयातील ताणतणाव क्षणात नाहीसा व्हायचा. मी आणि ढाके इतर स्टाफप्रमाणे श्रोत्यांमध्ये भूमिकेत असायचो.

एकदा सहज बोलताना मीनाने सांगितले की त्यांच्या घरी चौदा बहिण-भावंडे आहेत. आम्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आजच्या काळात दोन मुलांचे संगोपनही कठीण वाटते; अशा वेळी एवढ्या मोठ्या कुटुंबाला शिक्षण देऊन सर्वांना उच्चशिक्षित आणि यशस्वी बनविणाऱ्या तिच्या आई-वडिलांना मनापासून सॅल्यूट!

माझ्याकडे सिव्हिल पेमेंटचे काम असल्यामुळे अनेक कॉन्ट्रॅक्टर येत असत. त्यापैकी एखादा सिगारेट ओढत आला की मीना लगेच त्या ठिकाणाहून उठून बाहेर जायची. तिला सिगारेटच्या धुराची तीव्र ॲलर्जी होती. माझ्याकडे पेमेंटच्या पाठपुरावा करण्यासाठी आरसीएफचे इंजिनियर्स पण यायचे. त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर चलपतिराव वारंवार येत असत. ते चेंज स्मोकर होते. ते गेल्यावर मीना नाकाला हात लावून म्हणायची, "अरे शिंत्रे, त्यांच्या अंगाला सिगारेटचा वास येतोय." पण नियतीचा खेळ किती विलक्षण असतो! पुढे याच चलपतिराव यांच्याशी तिचा १९८१ साली प्रेमविवाह झाला. जीवनात अनेकदा काळ आपले विचार आणि भूमिका बदलून टाकतो, याचे हे सुंदर उदाहरण आहे.

आमच्या बोलण्यामध्ये कधी नवी मुंबईचा विषय निघाला तर नवी मुंबईबद्दल मीनाची फारशी चांगली धारणा नव्हती. पण पुढे माझ्याच सल्ल्याने तिने नवी मुंबईत फ्लॅट घेतला आणि काही वर्षे तेथे वास्तव्यासही आली. सांगायचे तात्पर्य आपण कितीही म्हटलं तरी नियती आपले विचार बदलवायला भाग पाडते हे यावरून सिद्ध होते.

आमच्या मैत्रीतील आणखी एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे तिच्या मुलाच्या चेन्नईतील लग्नाचा. आम्ही लग्नाला येणार असल्याचे समजताच तिने आमच्या तिघांसाठी विमानाची तिकिटे पाठवली आणि आलिशान हॉटेलमध्ये राहण्याचीही व्यवस्था केली. तिच्या या प्रेमळ आग्रहाने आम्ही अक्षरशः भारावून गेलो. त्यावेळी आमचं तिरुपती दर्शन आणि आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांची भेट आजही स्मरणात आहे.

१९८१ साली आरसीएफ सोडल्यानंतर तिचे वास्तव्य बहुतांशी परदेशात राहिले. तिच्या मुलाने आणि मुलीने तिच्याप्रमाणेच इंटरस्टेट मॅरेज केल्यामुळे भारतातील सहा राज्य जोडली गेल्यामुळे भारतातील अनेक संस्कृतींना एकत्र जोडले आहे.

काही वर्षांपूर्वी दुर्दैवाने चलपतिराव यांचे अपघाती निधन झाले आणि तिच्या आयुष्यात दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. त्या कठीण प्रसंगालाही तिने धैर्याने सामोरे जात आयुष्य पुढे नेले. आजही तिला आमच्या मित्रपरिवाराविषयी तेवढीच आत्मीयता आहे. ती सतत आमच्या संपर्कात असते, आमच्या सुख-दुःखात सहभागी होते आणि मैत्रीचे नाते जिवापाड जपते. खरंच, आयुष्यात पैसा, पद किंवा प्रसिद्धी यापेक्षा जर काही अमूल्य असेल, तर ती अशी माणसे आणि अशी निरपेक्ष मैत्री. अशा मैत्रीचे ऋण शब्दांत व्यक्त करता येत नाही; ते फक्त आयुष्यभर मनात जपता येते.भौगोलिक अंतर वाढले, देश बदलले, जीवनाच्या वाटा वेगवेगळ्या दिशांनी वळल्या; पण आमच्या मैत्रीच्या नात्यातील जिव्हाळा कधीच कमी झाला नाही. अलीकडच्या काळातही ती आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी मुंबईत येते, तेव्हा आमची भेट घेतल्याशिवाय परत जात नाही. तिच्या या आवर्जून भेट देण्यामागे दडलेला जिव्हाळा, आपलेपणा आणि मैत्रीवरील निष्ठा मनाला भावून जाते. खरी मैत्री अंतरावर नाही, तर मनातील ओलाव्यावर टिकून असते, याचीच ही सुंदर प्रचिती!


Comments

  1. This hit so close to home, Balasaheb Kaka! 🤍 In a world full of social media noise and fake vibes, finding grounded, genuine people really is the ultimate flex. Love your New Year’s resolution—spending real quality time with true friends is what actually matters

    ReplyDelete
  2. अति सुंदर शिंत्रे, तुझी भाषा शैली आणि रचनात्मक मांडणी, भावुकतेचा ओलावा हृदय अगदी अलगबलून आले.
    तू तर मला 50 वर्षे मागे आर.सी.एफ. मध्ये घेऊन गेलास आणि माझ्या आठवणी इतक्या जागृत केल्यास की, मी माझा भुतकाळ चलचित्राप्रमाणे दाखवलास. माझा डोळ्या समोर पुरा एक्सपान्शन सेक्शनचा हॉल आला, जेथून माझ्या आयुष्याची खरी सुरुवात झाली. श्रीयुत रावची ओळख, नावडत्यातून आवड, ओढ, प्रेम आणि त्याची परिणीती, त्यानंतर आमचे लग्न. किती सुंदर काळ होता .
    त्याचबरोबर तुझ्या सारखे आत्मीयता लावणार्‍या सहकार्‍यांमुळे ऑफिसमध्ये पण एक फॅमिली बनली होती.
    आणि तू माझ्या मनात आणि हृदयात एक प्रिय मित्राच्या रुपी घर करून राहिलास.
    धन्यवाद माझा मित्रा तुझ्या या शब्द रुपी
    Visualization लेखा बद्दल.
    असच प्रेम आणि मैत्री चिरंतन रहावी. 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ग्रामस्थ मंडळ व पतसंस्था वार्षिक सभा

🎶 हेमंतकुमार - अविस्मरणीय मैफल! 🎶

गणपतीपुळे पिकनिक : एक स्नेह संमेलन