काळ बदलला की माणसं?
🌱 समाज बदलायचा असेल, तर सुरुवात स्वतःपासून करूया!
मी मराठी शाळेत असताना गावातील एखादी व्यक्ती मुंबईला निघाली की तिला निरोप देण्यासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक गावाच्या वेशीपर्यंत जायचे. डोळ्यांत अश्रू, मनात काळजी आणि पुन्हा भेटण्याची ओढ असायची. आज मात्र जीवनाचा वेग वाढला आहे. माणसं जवळ आली, पण मनानं दूर जात आहेत, असं जाणवतं.मग प्रश्न पडतो... काळ बदलला म्हणून माणसं बदलली, की माणसांनीच आपल्या जगण्याची पद्धत बदलली?
🌿 धावपळीत हरवलेला जिव्हाळा
शिक्षण, नोकरी, पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखांच्या स्पर्धेत माणूस इतका गुंतला आहे की संवाद आणि नात्यांसाठी वेळ कमी पडतो. संपर्काची साधनं वाढली, पण मनमोकळ्या संवादाची ओढ कमी झाली. एकाच घरात राहूनही माणसं मोबाईलमध्ये व्यस्त असतात. सुखाच्या शोधात आपण तणाव तर वाढवत नाही ना?
🌸 वस्तूंपेक्षा माणसं महत्त्वाची!
महागड्या वस्तूंची आपण काळजी घेतो; पण आपल्या जवळच्या माणसांच्या भावनांची किती काळजी घेतो? वस्तू पुन्हा मिळवता येतात, पण मनातून दूर गेलेली माणसं पुन्हा जवळ येतीलच याची खात्री नसते. म्हणून नाती जपणं, भावना समजून घेणं आणि एकमेकांना वेळ देणं महत्त्वाचं आहे.
🌼 समाजपरिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून!
आपण आजच्या पिढीला संस्कार, आदर आणि माणुसकीचे धडे देतो. पण ज्या बदलांची अपेक्षा इतरांकडून करतो, ते आपल्या वागण्यात आहेत का, हा प्रश्नही स्वतःला विचारायला हवा.
समाज म्हणजे आपण, आपलं कुटुंब, मित्र, शेजारी आणि सभोवतालची माणसं. त्यामुळे समाज बदलण्यापूर्वी स्वतःच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवणं आवश्यक आहे.
🌻 छोट्या कृतींतून मोठा बदल!
समाज बदलण्यासाठी मोठ्या घोषणांची गरज नाही. प्रेम, प्रामाणिकपणा, परस्पर आदर आणि मदतीची भावना आपल्या दैनंदिन वागण्यात आणली, तरी सकारात्मक परिवर्तन घडू शकतं.
पैसा, प्रतिष्ठा आणि यश महत्त्वाचं आहेच; पण आपण किती माणसं जोडली, किती नाती जपली आणि किती मनांमध्ये आपुलकी निर्माण केली, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
काळ आणि परिस्थिती बदलत राहतील; पण प्रेम, जिव्हाळा, संवेदनशीलता आणि माणुसकी ही मूल्यं आपण जाणीवपूर्वक जपली पाहिजेत.
🌱 चला तर मग... स्वतः बदलूया, नाती जपूया, माणुसकी वाढवूया आणि समाजाच्या सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करूया!
“काल मी हुशार होतो, म्हणून मला जग बदलायचे होते; आज मी ज्ञानी आहे, म्हणून मी स्वतःला बदलत आहे.”
ReplyDelete~रुमी.
हे १३ व्या शतकातील पर्शियन सुफी गूढवादी, न्यायशास्त्रज्ञ आणि कवी होते.
🪴😊🙏🏻