आपुलकीचा झरा- महाविद्यालयीन स्नेहसंमेलन
आपुलकीचा झरा
एप्रिल २०२२ मधील महाविद्यालयीन स्नेहसंमेलनप्रसंगी व्यक्त केलेले मनोगत.आपल्या सर्वांच्या दृष्टीने आजचा हा दिवस म्हणजे तब्बल पन्नास वर्षांनंतर उगवलेला एक सुवर्णक्षण! कारण १९७५ साली बी.कॉम. पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्या सर्वांचे हे पहिलेच गेट-टुगेदर! अर्धशतकानंतर पुन्हा एकदा एकत्र येण्याचा हा आनंद शब्दांत व्यक्त करणे खरोखरच कठीण आहे.
या सुंदर स्नेहसंमेलनाच्या आयोजनासाठी श्री. विलास तुपे, श्री. राजाराम काळे, डॉ. महान्वर, प्रा. मंगेश भोसले, श्री. बाजीराव नरळे, ॲड. कामते, ॲड. अशोक शिंदे, प्रा. मोटे, प्रा. कोरे, श्री. शिवाजीराव नरळे, श्री. दीक्षित आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
या प्रसंगी आपले तत्कालीन रेक्टर व प्राचार्य लिपारे सर यांनी महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या आठवणी ऐकताना संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. त्या आठवणींनी केवळ भूतकाळातील सुखद क्षण पुन्हा अनुभवायला मिळाले असे नाही, तर उर्वरित आयुष्यासाठी एक नवी ऊर्जा आणि प्रेरणाही दिली.
तसेच प्राचार्य डॉ. नलावडे सर आणि प्राचार्य डॉ. बाळ कांबळे सर यांच्याशी झालेला संवादही मनाच्या खोलवर जाऊन भिडला. आपल्या महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर होत असल्याची आनंददायी बातमी त्यांनी दिली, तेव्हा सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नाही.
ओळख सत्रात प्रत्येकाने आपल्या वर्तमान जीवनाविषयी सांगताना आपण सुखी आणि समाधानी असल्याचे व्यक्त केले. त्यामुळे या गेट-टुगेदरला 'सुखी माणसांचा मेळावा' असे नाव दिले, तर ते निश्चितच समर्पक ठरेल!
ओळख सत्रात एका मित्राने गावातून एक-एक रुपया गोळा करून तब्बल ३६ रुपये जमा केले आणि त्या रकमेतून लेबर स्कीममध्ये प्रवेश घेतल्याची आठवण सांगितली. त्याचा हा संघर्ष ऐकताना उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांत पाणी तरळले. त्या क्षणी आपल्या संघर्षमय विद्यार्थीजीवनाची आणि त्या काळात केलेल्या कष्टांची तीव्रतेने जाणीव झाली.
महाविद्यालयीन जीवनातील माझ्या मैत्रीच्या आठवणी सांगताना माझ्या हॉस्टेलमधील सहकाऱ्यांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. माझे रूम पार्टनर श्रीनिवास जाधव आणि नारायण शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, आमचा तिसरा रूम पार्टनर भगवान शेडगे याच्या गावची यात्रा असल्यामुळे त्याला या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहता आले नाही.
आम्ही चौघांनी विद्यार्थीजीवनात एकत्र घालवलेले दिवस आजही मनात ताजे आहेत.
तब्बल पन्नास वर्षांनंतर मिळालेली ही भेट म्हणजे केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम नव्हता, तर नव्या उत्साहाने जगण्यासाठी मिळालेली एक प्रकारची संजीवनीच होती.
या स्नेहसंमेलनाने मनात निर्माण केलेला आनंद, मैत्रीचा जिव्हाळा आणि आपुलकीचा झरा असाच अखंड वाहत राहो, हीच मनापासून सदिच्छा!
या संम्मेलनातून तुमचा मित्रसंग्रह किती मोठा असावा याचा अंदाज येतो . ५० वर्षानंतर असं एकत्र येणे म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे . 😊🙏🏻🙏🏻
ReplyDelete