एक महान शिक्षणमहर्षी
दि.२२-९-२०२६.
१३९ वी कर्मवीर जयंती.
बहूजन समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे ओळखणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक,थोर शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना १३९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐
शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हा विचार केवळ शब्दांत न मांडता आपल्या कार्यातून सिद्ध करणारे थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी आणि ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी आयुष्य समर्पित करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते.ग्रामीण, गरीब आणि वंचित समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये आणि प्रत्येकाला स्वाभिमानाने उभे राहता यावे, या उदात्त ध्येयाने त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
‘कमवा आणि शिका’ या योजनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, शिस्त, जबाबदारी आणि आत्मनिर्भरतेची भावना रुजवली. त्यामुळे ही योजना केवळ आर्थिक मदतीचे साधन न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासाची आणि आत्मविश्वास वाढविण्याची प्रभावी चळवळ ठरली.
कर्मवीरांचे हे शैक्षणिक कार्य माझ्यासाठी केवळ इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय नाही, तर माझ्या स्वतःच्या जीवनाला दिशा देणारा आणि माझ्या विचारविश्वाला आकार देणारा अनुभव आहे. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेचा लाभ घेत मला डी. जी. कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व, कष्टाचे मूल्य आणि शिक्षणातून घडणारे जीवनपरिवर्तन मला जवळून अनुभवता आले. या अनुभवामुळे कर्मवीरांच्या कार्याविषयी माझ्या मनात अधिक आदर, कृतज्ञता आणि आत्मीयता निर्माण झाली.
याच प्रेरणेतून माझ्या गावाजवळ दुर्गम शेतकरी गावातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, त्यांना आपल्या गावापासून दूर जावे लागू नये आणि आर्थिक किंवा भौगोलिक अडचणींमुळे त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, या उद्देशाने हायस्कूल सुरू करण्याची संकल्पना पुढे आली.
माझ्या पत्नी सौ. रंजना शिंत्रे यांच्या अथक प्रयत्नांतून, चिकाटीतून आणि शिक्षणाविषयीच्या तळमळीमुळे ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली. त्यामुळे कर्मवीरांच्या विचारांचा केवळ लाभार्थी न राहता, त्यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा एक छोटासा प्रयत्न आमच्या हातून घडला, याचे मनस्वी समाधान आहे.
कर्मवीरांच्या विचारांचा दीप असाच सदैव तेवत राहो आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक पिढ्यांचे जीवन उजळत राहो!
कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन!
कर्मवीर आण्णांना शतकोटी प्रणाम ! आण्णांनी जो रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष लावला त्याच्या शितलछायेखालीच मी घडलो . माझं माध्यमिक आणि उच्च शिक्षण अनुक्रमे सद् गुरू गाडगे महाराज विद्यालय कुसूर आणि सद् गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे झाले . मी आयुष्यात जे काही यश मिळवले त्यात स्वावलंबन हा मूलमंत्र या संस्थेतच मी आत्मसात केला . 😊🙏🏻🙏🏻
ReplyDelete