सांगलीची पिकनिक : एक आनंदयात्रा - मार्च २०२५

 बऱ्याच वर्षांपासून आमच्या गप्पांमध्ये गाजत असलेली, अनेकदा चर्चेच्या शिडीवर चढूनही प्रत्यक्षात उतरलेली ही सांगलीची सफर अखेर निश्चित झाली. माने साहेबांच्या द्राक्षांच्या मळ्यात फेरफटका मारण्याचे स्वप्न अनेकांच्या डोळ्यांत होते, पण वेळ, योग आणि संधी यांचा ताळमेळ काही जमत नव्हता. गेल्या महिन्याभरात  गावच्या कार्यक्रमाला उपस्थिती,  चिरनेरच्या फार्म हाऊसवर मुक्काम आणि नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त पार्ट्यांचं प्रमाण वाढल्यामुळे पिकनिकला शक्यतो जायचं नाही असं मी ठरवलं होतं पण गेल्यावेळच्या एका पिकनिकपासून मी वंचित राहिलो होतो ती हुरहूर ही होतीच. त्यात जोशीचा आग्रह म्हणजे साखरेत माखलेली तलवार...नकार देणं अशक्यच! त्याच्या शब्दांत असा काही जादू होता की अखेर मी 'हो' म्हणालोच आणि खरंच, या पिकनिकचा आनंद घेतल्यानंतर जाणवलं की जर मी ही संधी गमावली असती, तर काही सुवर्णक्षण माझ्या आठवणींच्या अल्बममध्ये चुकले असते. माने साहेबांच्या मळ्यातला द्राक्षांचा गंध, तिथला ओलावा, मधाळ क्षण, आणि मित्रमंडळींच्या सहवासाची झिंगया साऱ्याने मन भरून गेलं. जोशीचे आभार मानून त्याच्यावर अधिक भार वाढवता मी त्याला एवढंच म्हणेन, ' जोशी, यु आर ग्रेट' कारण त्याच्या आग्रहामळेच हा आनंद माझ्या ओंजळीत पडला !

या पिकनिकचा अनुभव म्हणजे केवळ सहल नव्हती, तर आठवणींनी समृद्ध झालेला एक आनंदयात्रा होती. त्या प्रवासाच्या आदल्या रात्रीच मी आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमच्या बैठकीत सहभागी झालो होतो. घरी पोहोचल्यावर, थकव्याने आणि पार्टीच्या नशेतच बॅग भरली. त्यामुळे महत्त्वाच्या दोन गोष्टीएक कंगवा आणि दुसरी उन्हातान्हात डोक्याचे रक्षण करणारी कॅपघ्यायच्या राहिल्या. त्या गोष्टींची उणीव दुसऱ्या दिवशी प्रकर्षाने जाणवली, आणि माझ्या टक्कलप्रेमी मित्रांना (जोशी आणि कवळे) हसण्याचा एक नवीन विषय मिळाला.

सकाळी जोशीचा फोन आल्यावर मी खडबडून जागा झालो. वेळेच्या चाकोरीत बसण्याचा प्रयत्न करत, आंघोळ उरकली, कपडे बदलले, आणि गडबडीत बॅग उचलून धावत सुटलो. स्टेशनला पोहोचलो, तर रिक्षावाल्याजवळ सुट्टे पैसे नव्हते. नशिबाने तोच माझी बॅग उचलून तिकीट खिडकीपर्यंत धावत आला नसता, तर माझी  ट्रेन चुकली असती आणि घाडगे साहेबांचा ओरडा ऐकावा लागला असता.

ही पिकनिक म्हणजे केवळ रम्य सहल नव्हती, तर ती माझ्यासाठी ज्ञानाची नव्याने भर घालणारी तीर्थयात्रा ठरली. मी कोल्हापूरचा असलो तरी काही प्रेक्षणीय स्थळे पाहायची राहून गेली होती. यावेळी मात्र, गोंदवले मंदिर, यमाई मंदिर, औंध येथील बाळासाहेब महाराजांचे वस्तुसंग्रहालय, संताजी घोरपडे समाधी अशी अनेक ऐतिहासिक स्थळे प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. विशेषतः नरसोबाची वाडी येथे अगणित वेळा जाऊनही, संताजी घोरपडे यांच्या समाधीचं दर्शन घेण्याची संधी कधी मिळाली नव्हती. त्या पुण्यप्रसंगाला माने साहेब कारणीभूत ठरले.

 या पिकनिकच्या चविष्ट आठवणीही तितक्याच खास होत्या. गोंदवले येथील महाप्रसादातली शेवग्याच्या आमटीची चव प्रसादातला सात्विकपणा वेगळाच होता. नरसोबाची वाडी येथे एस. सोमण यांच्या सात्विक भोजनाचा आस्वाद घेतला आणि हो! या सहलीला गोड हास्याचा गोडवा मिळाला तो माने साहेबांच्या मिश्कील स्वभावामुळे. त्यांनी काळूबाळूच्या गावातून जाताना जोशी आणि कवळे यांची मजेशीर तुलना केलीजोशी नेहमीच कोणाला तरी चिमटा काढणारा, तर कवळे त्या जखमेवर मलम लावायच्या बहाण्याने अजून जोरात कुरतडणारा! पण हे समोरच्याच्या बुध्दीला लवकर लक्षात येईलच असे नाही. त्यांच्यामधून उगवणाऱ्या गमती-जमतींनी पिकनिक अधिकच रंगतदार केली.

 पिकनिकच्या रंगतदार दुनियेत आमचा कवळे म्हणजे एक कुशल कारागीर! तो केवळ हिशोब ठेवतो असे म्हणणे म्हणजे चंद्राला फक्त रात्रीचा दिवा म्हणण्यासारखे आहे. प्रत्येक पिकनिकमध्ये तो नुसता आकडेमोड करत नाही, तर संपूर्ण अनुभवाची वीण गुंफतो. खाण्याच्या बाबतीत तर त्याचा हात कोणत्याही अनुभवी खानसाम्याच्या कल्पकतेला मागे टाकणारा! कोणाला काय हवे, कोणता पदार्थ कुठे मिळेल, कुठे किती मागवायचंसर्व गणिते त्याच्या डोक्यात असतात. प्रत्येक चव तो इतक्या कल्पकतेने जुळवतो की पानावर वाढलेल्या जेवणाइतकाच, त्याच्या व्यवस्थेचा आस्वाद घेण्याचा मोह सर्वांनाच होतो आणि मग तो जेव्हा एखादा प्रसंग सांगतो, तेव्हा त्याची गोष्ट म्हणजे जणू रंगीबेरंगी कुंचल्यांनी रेखाटलेले एक जिवंत चित्रच! त्याच्या शब्दांना आवाज असतो, हालचाल असते, जणू काही तो केवळ सांगत नाही, तर प्रत्येक जण त्या गोष्टीचा प्रत्यक्ष भाग झाल्याचा भास होतो. त्याच्या या शैलीमुळे प्रत्येक पिकनिकच्या आठवणी अधिकच चमकदार होतात आणि हिशोब ठेवणाऱ्या या कलाकाराशिवाय आमची कोणतीही सहल पूर्णच होत नाही!

माने साहेबांच्या नातेवाईकांचा पाहुणचार म्हणजे अगदी मनापासून केलेली स्नेहपूर्ण मैफल होती. माने साहेबांचे पुतणे रणजीत यांनी तर आमची विशेष विचारपूस सगळी सोय केली. दुसऱ्या दिवशी सकाळी माने साहेबांच्या बहिणीच्या द्राक्षांच्या बागेत पाऊल टाकलं आणि डोळ्यांसमोर हिरवाईचा एक अलौकिक सागर उभा राहिला. डोक्यावर ऊन्हाचा मारा असुन सुध्दा वाऱ्याच्या झुळुकीसोबत डोलणाऱ्या वेली जणू नृत्यरत होत्या, त्यांच्या लहलहाटीमध्ये कष्टांची कहाणी गुंफलेली होती. द्राक्षांचे गोंडे सुर्यकिरणांत चमकत होते, जणू काही निसर्गाने स्वतःच्या हातांनी सोन्याचा मुलामा दिला होता.

या हिरवाईत एक वेगळेच तेज अनुभवायला मिळालेती होती बागेत भेटलेली माने साहेबांची  पदवीधर भाची...सोनी. तिच्या डोळ्यांत स्वप्नांची चमक होती, हातांनी मातीला केलेली स्पर्शभेट तिच्या श्रमशीलतेची साक्ष देत होती. शिक्षण आणि कष्ट यांच्या संगमातून ती स्वतःची वाटचाल करत होती. तिच्या बोलण्यात असलेला आत्मविश्वास, तिच्या श्रमांना असलेला आत्मसन्मान पाहून मन भारावून गेलं.

दुसर्या दिवसाची ती संध्याकाळ अजूनही आठवली, की अंगावर काटा येतो. सांगलीच्या वर्दळीच्या रस्त्यावरून आमची गाडी खरेदीसाठी म्हणून गाडी थांबली. वातावरणात हलकासा गारवा, बाजारात लगबग आणि मनात उत्साहसगळं काही छानच होतं. पण पुढच्या काही क्षणांत घडलेल्या घटनेनं मात्र माझ्या उत्साहावर पाणी फिरवलं.

मी सहजच गाडीतून उतरत होतो, आणि अचानक कटक असा आवाज झाला. काही कळायच्या आत, माझ्या हाताची चारही बोटं समोरच्या कारच्या दरवाज्यात अडकली! असह्य वेदना झाल्या, आणि मी जोरात किंचाळलो. त्या किंचाळीने बाजारातील गोंधळ क्षणभर स्तब्ध झाला, पण तरीही आजूबाजूच्या लोकांना काही समजण्याआधीच मी वेदनेच्या गर्तेत गुरफटून गेलो होतो.

मी हात ओढण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो कारच्या  दारामध्ये घट्ट अडकला होता. तो क्षण जणू काळजात चर्रर्र करून गेला. माझ्या मनात एकच विचार—"बस! आता तर चारही बोटं गेलीच!" पण सांगलीचा गणपती बाप्पा माझ्यावर कृपा ठेवून होता. काही वेळाने दरवाजा उघडला, आणि मी हात मागे घेतला. हात सुटला खरा, पण बोटं सुजलेली, लालेलाल... अगदी जणू चार जखमी फुलं!

समोरच एका मेडिकल स्टोअर होतं. तिथे बर्फाच्या थंडगार स्पर्शाने वेदना किंचित कमी झाल्या आणि एका वेदनाशामक गोळीने मला थोडा दिलासा दिला. पण परमेश्वराच्या कृपेने आणि वेळीच मिळालेल्या प्रथमोपचाराने मोठा अनर्थ टळला.

मी प्रवास वर्णन लिहित असताना टी.व्ही. वर न्यूज 18 लोकमतवरीलमुक्ता सन्मान 2025’ हा कार्यक्रम सुरू होता. महिला दिनाच्या निमित्ताने होणारा हा सत्कार सोहळा पाहताना सोनीची आठवण प्रकर्षाने झाली. तिच्या जिद्दीला, तिच्या मेहनतीला, तिच्या संघर्षाला हा सन्मान अर्पण व्हावा, असं वाटून गेलं. खरं तर अशीच माणसं खऱ्या अर्थाने या सन्मानाचे खरे मानकरी असतात. महाराष्ट्राला तिच्या मेहनतीचा, तिच्या कर्तृत्वाचा गौरव लवकरच कळेल. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर बागेतील त्या वेलींसारखीच तीहीआधार मिळाला तरी जमिनीशी घट्ट जोडलेली, पण त्यांचं मोल ओळखून धीरगंभीरपणे वाटचाल करणारी. तिचा प्रवास एक दिवस झगमगता ठरेल, याची मला खात्री वाटते.

या प्रवासाची सांगता झाली ती अमित माने यांनी उदय हॉटेलमध्ये दिलेल्या खास मेजवानीने! तेथील चमचमीत जेवण, गप्पांची मैफल, आणि त्यांच्या -60° ते +60° तापमानाच्या अद्भुत जागतिक प्रवासकथांनी आम्हाला थक्क केले. पार्टीनंतर खाल्लेल्या पानाची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय. शेवटी, "आटपाटीचं मटण भारी असतं, तुम्ही एक दिवस थांबता कां?' असा आग्रह झाला आणि घाडगे साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता संमती दिली. हे या वयातील त्यांच्या मनाचं तारुण्य व उत्साह बघून आम्हाला त्यांची दाद द्याविशी वाटली. त्याचप्रमाणे, घाडगे साहेबांचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची कलाही विलक्षण आहे. त्यांच्या उत्साही दृष्टीतून पिकनिकची प्रत्येक आठवण अमर झाली.

यावेळी मी पत्त्यांचा खजिना सोबत घेतला होता, जणू आमच्या रात्रीच्या गप्पांना रंग भरणारा गुप्त मसाला! दुसऱ्या दिवशी रात्री आठवण करताच, साऱ्यांच्या डोळ्यांत चमक तरळली, जणू काही दिवसभराचा थकवा विसरून त्यांना या खेळाच्या जादूमय दुनियेत उडी घ्यायची होती.पण जोशी मात्र वेगळ्याच सूरात बोलू लागला"मला काही खेळ जमत नाही!" जणू एखादा नवख्या गंधर्भाने गाण्यापासून दूर राहू पाहावे! आम्हीही त्याच्या त्या निरागस कबुलीवर विश्वास ठेवला. पण खेळ सुरू झाला... रात्रीच्या शांततेत पत्त्यांचे फडफडणे जणू विजेच्या ठिणग्या उडवत होते आणि खेळ रंगत गेला.

पहाटेचे तिन वाजले आणि जेव्हा हिशोबाची वेळ आली, तेव्हा सगळ्यांच्या नजरा जोशींकडे स्थिरावल्याहा नवशिक्या खेळाडू तर सर्वांचा बाप निघाला! त्याने अगदी कुशल जादूगारासारखा डाव साधला आणि बाजी आपल्या जवळ सारून घेतली. आता मात्र आम्ही समजून चुकलो की या शांत सुरावर गुणगुणणाऱ्या जोशी महाराजांनीच अखेरच्या थापेने संपूर्ण फड आपल्या हातात घेतला होता!

माने साहेबांच्या नातेवाईकांच्या आपुलकीने  दिलेली द्राक्षे, चिक्कू, कोवळे बेबी कॉर्न आणि घरगुती बनवलेला खाकरा  हे घरी आणताना आम्हास दुसरी जादा बॅग करावी लागली. त्यांच्या घरून निघताना हाततल्या बॅगपेक्षा हृदय अधिक भरलेलं होतंत्या प्रेमळ आदरातिथ्याच्या उबदार स्पर्शाने!

अशा या सहलीने आठवणींच्या गाठोड्यात एक सोनेरी पान जोडले. केवळ ठिकाणे पाहून नव्हे, तर हास्य, आपुलकी आणि सहप्रवाशांच्या मनमिळावूपणाने ही पिकनिक अविस्मरणीय ठरली.


Comments

Popular posts from this blog

गपपतीपुळे पिकनिक : एक स्नेह संमेलन - एप्रिल २०२५